Veer Savarkar Secret Files Web Series : 'वीर सावरकर, सिक्रेट फाइल्स' (Veer Savarkar Secret Files) ही वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजच्या माध्यमातून भारताच्या स्वतंत्र्य लढ्याचा इतिहास उलगडला जाणार आहे. आता या सीरिजच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. 


'वीर सावरकर, सिक्रेट फाइल्स' या हिंदी भाषेतील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आयुष्यावरील पहिल्या वेबसीरिजच्या शूटिंगचा प्रारंभ भोर येथील राजवाड्यात घटस्थापनेच्या मुहूर्तावर करण्यात आला. यावेळी या वेब सीरिजचे लेखक दिग्दर्शक योगेश सोमण उपस्थित होते. 


सावरकरांचे कार्य समाजासमोर आणणार : योगेश सोमण


'वीर सावरकर, सिक्रेट फाइल्स' या सीरिजचे दिग्दर्शक योगेश सोमण म्हणाले,"सावरकरांनी आपले संपूर्ण आयुष्य कुटुंबासहित देशकार्यासाठी अर्पण केले. त्यामुळे त्यांचे कार्य समाजासमोर आलेच पाहिजे असे आम्हाला वाटते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका करणाऱ्यांना उत्तर देणे हे आमचे नॅरेटिव्ह नसून 'वीर सावरकर, सिक्रेट फाइल्स' या वेबसीरिजच्या माध्यमातून इतिहासाला अवगत असणारे, ज्याचे पुरावे उपलब्ध आहेत, जे पुरावे तार्किक दृष्टीने मांडता येतील आणि त्यातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तिमत्व जसे होते तसे मांडण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे". 


भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास उलगडणार


योगेश सोमण पुढे म्हणाले,"सावरकर यांचे जीवन हा जवळपास 100 वर्षांचा इतिहास आहे. लोकांनी यातून प्रेरणा घ्यावी, लोकांचे गैरसमज दूर व्हावे, राजकीय, सामाजिक स्वार्थासाठी तयार केले जाणारे नॅरेटिव्ह पुसले जावे असा आमचा प्रयत्न असणार आहे. शिवाजी महाराज यांच्या व्यतिरिक्त सावरकर यांचे कुणीही गुरु नव्हते. सावरकर जन्मतः नेते होते. एकलव्यासारखी त्यांची वाटचाल आहे. सिक्रेट फाईल्स म्हणजे सावरकरांचे व्यक्तिमत्व जे लोकांना माहित नाही ते अनफोल्ड करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे".


सोमण म्हणाले की,"आजपर्यंत सावरकर यांच्यावर आधारित नाटक, चित्रपट आले परंतु वेब सीरिजच्या माध्यमात प्रथमच ही सीरिज समोर येणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संपूर्ण जीवनावर हिंदी भाषेतील चार सीझनमध्ये ही वेबसिरीज असणार आहे. पहिल्या सिझनमध्ये सावरकर यांच्या जन्मापासून म्हणजे 1883 ते मार्सेलिस येथे समुद्रात उडी मारण्यापर्यंतचा कालखंड पाहता येणार आहे".


सावरकरांचे जीवनकार्य संपूर्ण देशाला माहित व्हावे यासाठी हिंदी भाषेत ही वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सावरकर यांच्या आयुष्यावर आधारित अनेक कलाकृतींची निर्मिती करण्यात आली असली तरी या आगामी वेबसीरिजसाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 


संंबंधित बातम्या


Swatantra Veer Savarkar : काळ्या पाण्याची शिक्षा ते सेल्युलर जेलमधील छळ; अंगावर शहारे आणणारा 'स्वातंत्र्यवीर सावरकर'चा टीझर आऊट