Nagraj Manjule Naal 2 Song Out : नागराज मंजुळे (Nagraj Manjule) सध्या 'नाळ 2' (Naal 2) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. लवकरच हा बहुचर्चित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या सिनेमातील 'भिंगोरी' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. अल्पावधीतच हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. 


'नाळ' हा सुपरहिट सिनेमा 2018 मध्ये प्रेक्षकांच्या आला होता. राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या या चित्रपटाशी प्रेक्षकांशी नाळ जोडली गेली. ‘चैत्या’चे बोबडे बोल सगळ्यांनाच भावले. या सिनेमातील गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. आता या सिनेमातील 'भिंगोरी' हे पहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.


'भिंगोरी' गाण्याबद्दल जाणून घ्या...


'नाळ 2' या सिनेमातील 'भिंगोरी' या गाण्याचे बोल वैभव देशमुख यांनी लिहिलं असून ए. व्ही. प्रफुल्लाचंद्रा यांचे संगीत या गाण्याला लाभले आहे. तर या सुरेल गाण्याला मास्टर अवन, कडूबाई खरात, मनीष राजगिरे आणि नागेश मोरवेकर यांचा आवाज लाभला आहे. झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. सुधाकर रेड्डी यक्कंटी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 


'नाळ 2' कधी येणार प्रेक्षकांच्या भेटीला? (Naal 2 Release Date)


'नाळ 2' हा सिनेमा 10 नोव्हेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 2018 साली प्रदर्शित झालेल्या ‘नाळ’मध्ये विदर्भातल्या नदीचं विस्तीर्ण पात्र दिसलं होतं. त्या पात्रात पाणी कमी, आणि वाळवंट जास्त होतं. असं असूनही पडद्यावर विदर्भ कधी नव्हे इतका विलोभनीय दिसला होता. ती कमाल होती सुधाकर रेड्डी यक्कंटी यांच्या कॅमेराची. तर अशा रखरखीत वातावरणातही माया करणाऱ्या माणसांच्या सावलीत चैतू घडत होता. आता ‘नाळ 2’ मध्ये मोठा झालेला चैतू आपल्या खऱ्या आईला भेटायला पश्चिम महाराष्ट्रात आला आहे. 


‘भिंगोरी’ या गाण्यातून नजरेत भरतं ते पश्चिम महाराष्ट्रात डोंगररांगांनी वेढलेल्या गावाचं निसर्गसौंदर्य आणि या गावात आलेल्या चैतूला बघून आनंदी झालेले गावकरी. निसर्गाचं हिरवंगार रुप आणि गावकऱ्यांचं प्रेम बघून भारावलेला चैतू खऱ्या आईला बघतो, पण इथून पुढे त्याच्या हा प्रवास नेमका कुठवर जातो ती कहाणी चित्रपटात बघायला मिळेल. 


‘जाऊ दे ना वं’ या पहिल्या भागातील लोकप्रिय गाण्यानंतर आता ‘भिंगोरी’ या गाण्यातून चैतूच्या या प्रवासाची सुरुवात बघायला मिळतेय. नात्यांमधले चढ-उतार आणि गुंता हा चैतूच्या अल्लड वयाला झेपेल का अशाच प्रश्न प्रेक्षकांना पडत असणार. 10 नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर ‘नाळ’चा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, तेव्हा प्रेक्षकांच्या मनात निर्माण होणाऱ्या प्रश्नांची उत्तरं मिळतीलच.


'भिंगोरी' या गाण्याबद्दल बोलताना दिग्दर्शक सुधाकर रेड्डी म्हणतात,"गावातील खूप छोट्या छोट्या गोष्टी या गाण्यात टिपण्यात आल्या आहेत. गाण्याची टीमही अतिशय जबरदस्त आहे.  ज्याप्रमाणे ‘नाळ’च्या गाण्यावर प्रेक्षकांनी प्रेम केले तसेच प्रेम ‘नाळ 2’मधील गाण्यांवरही करतील याची खात्री आहे". 



संबंधित बातम्या


Naal 2 Teaser: नागराज मंजुळेंनी शेअर केला 'नाळ-2' चा टीझर; माय-लेकाची गोष्ट घेऊन पुन्हा रुपेरी पडदा गाजवणार