मुंबई : सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी आणि मोहम्मद अझरुद्दीन यांच्यावर आधारित सिनेमांची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत, असं टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीने म्हटलं आहे. हे तिन्ही सिनेमे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
काही दिवसांपूर्वीच सचिन तेंडुलकरने त्याच्यावरील ‘सचिन- अ बिलियन ड्रीम’ सिनेमाचं टीझर रिलीज केलं. त्याचसोबत, बॉलिवूड अभिनेता इम्रान हाश्मीची प्रमुख भूमिका असलेला मोहम्मद अझरुद्दीनच्या आयुष्यावर आधारित ‘अझर’ सिनेमाही लवकरच प्रदर्शित होणार आहे. तर सुशांतसिंह राजपूतची मुख्य भूमिका असलेला ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ हा धोनीवरील सिनेमाही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
“हे तिन्ही सिनेमे पाहण्यासाठी प्रचंड उत्सुक आहे. यातील सर्वाधिक आतुरतेने वाट पाहतो आहे, ते सचिनच्या सिनेमाची. कारण मी स्वत: सचिनच्या आठवणींशी जोडलेलो आहे”, असे विराट कोहलीने म्हटलं आहे.