मुंबई : इंडियन मोझार्ट अशी ज्याची ख्याती आहे, तो महान संगीतकार म्हणजे ए. आर. रहमान. रहमान यांनी संगीतबद्ध केलेलं गाणं गाण्याची अनेक मोठमोठ्या गायकांची इच्छा असते. मात्र ही संधी भारताचा कसोटी क्रिकेट कर्णधार विराट कोहलीच्या वाट्याला चालून आली आहे.


 
विराटने रोहित शर्माच्या लग्नात लगावलेले ठुमके, किंवा अनेक इव्हेंट्समध्ये केलेला डान्स सर्वांनी पाहिला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या पार्टींमध्ये विराटचा गाता गळा अनेकांनी अनुभवला आहे. मात्र आता प्रोफेशनल स्टुडिओत रेकॉर्ड झालेलं गाणं चाहत्यांना ऐकायला मिळणार आहे.

 
प्रिमिअर फुत्सल लीगच्या अधिकृत अँथमचा काही भाग विराटच्या आवाज स्वरबद्ध करण्यात आला आहे. दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, गोवा, कोची, हैदराबाद आणि बंगळुरु या आठ टीम्स प्रिमिअर फुत्सल लीगमध्ये भिडणार आहेत. 15 ते 24 जुलै दरम्यान हे सामने खेळवले जातील. फुत्सल हे फुटबॉलचं शॉर्टर व्हर्जन आहे. हा प्रकार युरोप आणि दक्षिण अमेरिकेत प्रसिद्ध असून इंडोर खेळला जातो.

 
'नाम है फुत्सल..' असे गाण्याचे बोल असून त्याचा म्युझिक व्हिडिओ येत्या दोन आठवड्यात लाँच होणार आहे. आठवड्याभरापासून या गाण्यावर काम सुरु असून विराटला यात रॅप पार्ट दिल्याचं रहमान यांनी सांगितलं. गाण्याचे बोल इंग्रजीत असून विराटला सोपं जावं म्हणून रॅपसह वेगळ्या पद्धतीचं मिक्सिंग केल्याचंही ते सांगतात.

 
विराटने मात्र ए. आर. रहमान यांच्यासोबत काम करताना नर्व्हस असल्याचं म्हटलं आहे. माझ्या बालपणीच्या अनेक आठवणी या व्यक्तीशी निगडीत आहेत. क्रिकेटची तयारी कशी करायची, हे मला माहित आहे, मात्र गाण्याचा अनुभव माझ्यासाठी नवीन आहे.

 

 

https://twitter.com/imVkohli/status/739845370092630016