मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या अफेअरबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जातात. दोघांनीही याबाबत अधिकृत वाच्यता केली नसली, तरी विराट कोहलीने त्यांच्या प्रेमाबाबत उघड संकेत दिले आहेत. ट्विटर, इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडियांवर विराटने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

'जर तुमची इच्छा असेल, तर प्रत्येक दिवस हा व्हॅलेंटाईन डे असतो. तू माझ्यासाठी प्रत्येक दिवस व्हॅलेंटाईन डे करतेस' अशा आशयाच्या ट्वीटसोबत विराटने अनुष्कासोबतचा फोटो शेअर केला आहे. आतापर्यंत अनुष्काशी नाव जोडलं गेल्याने आगपाखड करणाऱ्या विराटने अशा हिंट्स दिल्या आहेत. त्यामुळे साहजिकच सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.


विराट आणि अनुष्काला एकत्र पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. मात्र मधल्या काळात त्यांच्या नात्यातही 'बॅड पॅच' आल्याचं म्हटलं जायचं. दोघांचं ब्रेक अप झाल्याच्या चर्चा होत्या, मात्र पुन्हा दोघे एकत्र दिसले. दोघांनी उघडपणे आपल्या प्रेमाची कबुली दिली नसली, तरी कोहलीच्या अनेक मॅचेसना अनुष्का न चुकता हजेरी लावायची.

विराटला 'फिलौरी'चा निर्माता म्हणणं माझा अपमान, अनुष्काचा संताप


विशेष म्हणजे, अनुष्काने उपस्थिती लावली असताना टीम इंडिया एकदा सामना हरली होती. मात्र सोशल मीडियावर या पराभवाचं खापर अनुष्कावर फोडलं होतं. त्यावर चिडलेल्या विराटने टवाळखोरांचा चांगलाच समाचार घेतला होता. काहीच दिवसांपूर्वी 'फिलौरी'या अनुष्काची निर्मिती असलेल्या चित्रपटात विराटने पैसे ओतल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यावरुनही अनुष्काने आगपाखड केली होती. त्यामुळे दोघांमध्ये सारं काही आलबेल आहे की नाही, अशा शंका चाहत्यांच्या मनात निर्माण झाल्या होत्या.

करिअरमध्ये जानेवारी 2016 पासून कोहलीने क्रिकेटमध्ये अनेक विक्रम मोडित काढले आहेत. वन डे क्रिकेटचं कर्णधारपद स्वीकारल्यानंतरही कोहलीने अजिंक्य राहण्याचा मान मिळवला आहे. दुसरीकडे अनुष्काचे सुलतान, ऐ दिल है मुश्किल यासारखे चित्रपटही गाजत आहेत.