जळगाव : 'टाईमपास' फेम अभिनेत्री आणि गायिका केतकी माटेगांवकरला जळगावमध्ये चाहत्यांचा मनस्ताप सहन करावा लागल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. केतकीचे वडील पराग माटेगावकर यांनी यासंदर्भात पोलिस महासंचालक सतीश माथूर यांना पत्र लिहून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
बहिणाबाई महोत्सवाच्या उद्घाटनासाठी केतकी माटेगांवकर जळगावमध्ये आली होती. मात्र केतकीला पाहण्यासाठी चाहत्यांनी एकच गर्दी केली. कार्यक्रम संपल्यानंतर स्टेजवरुन उतरताना चाहत्यांनी तिच्याभोवती गराडा केल्याने तिला तिथून बाहेर पडता येईना.
अखेर उपस्थित काही महिलांनी हाताचं कडं करुन केतकीला बाहेर काढून गाडीपर्यंत पोहोचवलं, असं पराग माटेगांवकर यांनी पत्रात लिहिलं आहे.
पराग माटेगांवकर यांनी या प्रकारासाठी आयोजकांना दोषी धरलं आहे. घडलेल्या प्रकाराचा तिला आणि तिच्या कुटुंबीयांना प्रचंड मनस्ताप झाल्याचं त्याचं सांगितलं. तसंच पुन्हा कोणत्याही महिला कलाकारासोबत अशी घटना घडू नये म्हणून हे पत्र लिहित असल्याचं त्यांनी सांगितलं.
केतकी माटेगांवकरच्या वडिलांचं पत्र
प्रति,
सतीश माथूर,
पोलीस महासंचालक,
महाराष्ट्र राज्य
महोदय
मी पराग माटेगांवकर. माझी मुलगी केतकी माटेगांवकर एक प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री आहे. तिला जळगांवला बहिणाबाई महोत्सवाच्या उद्घाटनाकरता ११ फेब्रुवारी २०१७ या तारखेला सेलिब्रिटी म्हणून आमंत्रित केलं होतं. दिपक परदेशी हे आयोजक होते. प्रचंड गर्दी केतकी भोवती झाली. पण आयोजकांनी security ची काहीही व्यवस्था केली नव्हती. पोलिस नाही किंवा बाऊन्सर्स नाही किंवा साधा गार्डही नाही. एक मुलगी म्हणून त्यांनी ती व्यवस्ता बघायला हवी होती. प्रचंड जन समुदाय असल्यामुळे तिला तिथून बाहेर पडता येत नव्हतं आणि तो आयोजक काही प्रयत्नपण करत नव्हता. उलट कार्यक्रमाकरता थांबावयास सांगत होता. हे सगळं बघून तिथल्या स्थानिक महिलांनी एक साखळी करुन तिला गाडीपर्यंत पोहोचवलं. कुठल्याही महिला कलाकाराकरीता हे खूप त्रासदायक आहे. सुदैवाने एक वडील म्हणून मी तीथे होतो म्हणून हवी ती काळजी घेऊ शकलो. तिथे काही स्थानिक व्यक्तींनी आणि महिलांनी ज्यांचा आयोजनाशी संबंध न्हवता त्यांनी वेळेवर मदत केल्यामुळे काही अनुचित प्रकार घडला नाही. पण यापुढे ही काळजी महिला कलाकारांना आमंत्रित केल्यावर घेण्यात यावी ही अपेक्षा आहे कारण काही घडल्यानंतर मग संबंधित व्यक्तींवर कारवाई करणे हा काही उपाय नाही. त्या दिवशी बाहेर जाण्याकरता मार्ग मुद्दामच ठेवला नाही असं वाटलं कारण कुठलीही सेलिब्रिटी मधून निघून गेली की लोकही थांबत नाही. पण हा प्रसंग भविष्यात पुन्हा घडू नये, या हेतूनेच फक्त मी आपल्याला हे कळवतो आहे. कृपया योग्य ती कारवाइ करावी ही विनंती.
धन्यवाद
स्नेहांकित
पराग माटेगांवकर