कचरा फेकणाऱ्या अरहानची विराट,अनुष्काला नोटीस
एबीपी माझा वेब टीम | 24 Jun 2018 05:58 PM (IST)
अरहान सिंहने 23 जूनला विराट आणि अनुष्काला ही कायदेशीर नोटीस पाठवली आहे. “मला आता या प्रकरणावर काहीच बोलायचे नाही, मी त्यांच्या उत्तराची वाट बघतोय,” असं या तरूणाने ‘इंडिया टुडे’ वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.
मुंबई : ‘मला सोशल मीडियावर बदनाम करण्यात आलं,’ असं म्हणत अरहान सिंहने विराट कोहली आणि अनुष्का शर्माला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. काही दिवसांपूर्वी रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या अरहान सिंह नावाच्या तरुणाला अनुष्का शर्माने झापलं होतं. नंतर विराटने रस्त्यात घडलेल्या या सर्व प्रकाराचा व्हिडीओ बनवून तो सोशल मीडियावर पोस्ट केला. अरहान सिंहने 23 जूनला विराट आणि अनुष्काला ही कायदेशीर नोटीस पाठवली आहे. “मला आता या प्रकरणावर काहीच बोलायचे नाही, मी त्यांच्या उत्तराची वाट बघतोय,” असं या तरूणाने ‘इंडिया टुडे’ वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. विराटने ट्विटरवर शेअर केलेला हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडीओला 1.25 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले,तर आठ हजारांपेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडीओ रिट्वीट केला. सोशल मीडियातून मोठी प्रतिक्रिया उमटल्यानंतर अरहान सिंहने एक पोस्ट लिहित आपली बाजू स्पष्ट केली होती. तर दुसरीकडे, “विराट आणि अनुष्काने प्रसिद्धी मिळवण्यासाठी माझ्या मुलाचा वापर केला,” असं म्हणत अरहानच्या आईनेही विराट आणि अनुष्का शर्मावर टीका केली होती.