Vikrant Rona : नुकताच रिलीज झालेला 'विक्रांत रोणा'(Vikrant Rona) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. या चित्रपटाचे अवघ्या चार दिवसांतील कलेक्शन पाहता, हा चित्रपट नक्कीच मोठा विक्रम करू शकेल, असा अंदाज बांधला जात आहे. किच्चा सुदीप (Kiccha Sudeep), जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez), निरुप भंडारी (Nirup Bhandari) आणि नीता अशोक (Neeta Ashok) स्टारर ‘विक्रांत रोणा’ हा चित्रपट 28 जुलै रोजी प्रदर्शित झाला आणि चौथ्या दिवशी या चित्रपटाने जागतिक बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.


पहिल्याच वीकेंडला हा चित्रपट दमदार कलेक्शन करण्यात यशस्वी झाला. यामुळे जगभरातील कमाईच्या बाबतीत चित्रपटाने तब्बल 115-120 कोटींचा आकडा पार केला आहे. ‘विक्रांत रोणा’ 28 जुलै रोजी थिएटरमध्ये दाखल झाला. या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांत 80 कोटींची कमाई केली होती. त्यानंतर वीकेंडलादेखील बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची जादू दिसली आहे.


साऊथमध्ये चित्रपटाची क्रेझ


'विक्रांत रोणा'ची बॉक्स ऑफिसवरील ओपनिंग म्हणावी तितकी खास नव्हती. कन्नड प्रेक्षकांनी या चित्रपटाला उदंड प्रतिसाद दिला. पण, हिंदी पट्ट्यात या चित्रपटाला प्रेक्षकांनी फारसं महत्त्व दिलं नाही. या चित्रपटाशी सलमान खानचे नाव जोडले गेल्याने हा चित्रपट इतर साऊथ चित्रपटांप्रमाणे बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरेल अशी अपेक्षा होती. सलमान खान या चित्रपटाचा प्रस्तुतकर्ता आहे. हा चित्रपट कन्नड, हिंदी व्यतिरिक्त तामिळ, तेलुगु आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित झाला आहे.


चौथ्या दिवशी केली धुंवाधार कमाई!


मीडिया रिपोर्टनुसार, 'विक्रांत रोणा' रिलीजच्या चौथ्या दिवशी म्हणजे रविवारी जवळपास 29 कोटींचा व्यवसाय करण्यात यशस्वी ठरला आहे. या चित्रपटाची क्रेझ बॉक्स ऑफिसवर दिसत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांसह समीक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे.


‘विक्रांत रोणा’ ही एका गावाची कहाणी आहे, जिथे राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. याच भीतीला समूळ नष्ट करण्यासाठी विक्रांतची (किच्चा सुदीप) गावात एन्ट्री होते. या चित्रपटात ‘विक्रांत’ एका धाडसी पोलिसाच्या भूमिकेत दिसत आहे.


चित्रपट थ्रीडीमध्ये रिलीज!


‘विक्रांत रोणा’ हा एक पॅन इंडिया चित्रपट आहे, जो हिंदी तसेच तमिळ, मल्याळम, तेलुगु आणि कन्नडमध्ये प्रदर्शित झाला आहे. अनूप भंडारी दिग्दर्शित ‘विक्रांत रोणा’ हा चित्रपट थ्रीडीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाचे प्रमोशन सलमान खानने हिंदीमध्ये, चिरंजीवी तेलुगू, मोहनलाल मल्याळम आणि सिम्बू यांनी तामिळमध्ये केले आहे. 'विक्रांत रोणा' हा चित्रपट 95 कोंटीच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. त्यामुळे या चित्रपटाने किमान 150 कोटींचा आकडा पार करावा, अशी निर्मात्यांची इच्छा आहे.


संबंधित बातम्या


Vikrant Rona : किच्चा सुदीपच्या ‘विक्रांत रोणा’चा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला, सलमान खाननेही केलं कौतुक!


Movie Release This Week : 'टाइमपास 3' ते 'एक विलेन रिटर्न्स'; 'या' आठवड्यात प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी