Vikrant Massey Net Worth: बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेस्सीनं (Vikrant Massey) सोशल मीडियावर पोस्ट (Social Media Post) करत अभिनयातून संन्यास घेत असल्याचं जाहीर केलं आणि संपूर्ण सिनेसृष्टी हादरली. करिअरच्या सर्वोच्च शिखरावर असूनही विक्रांतनं असा निर्णय का घेतला? हे कोडं सोडवण्याच्या प्रयत्नात चाहते असतानाच आता खुद्द विक्रांतनं मी संन्यास घेत नाहीय, लोकांनी चुकीचं वाचलं असं म्हणत स्पष्टीकरण दिलं आहे. विक्रांतला नेमकं म्हणायचंय काय? त्यानं पोस्ट का केली? त्या पोस्टमधून त्याला काय सुचवायचं होतं? यांसारखे असंख्य प्रश्न चाहत्यांच्या मनात आहेत. विक्रांतनं आपल्या पोस्टमधून सांगितलेलं की, 2025 मध्ये येणाऱ्या त्याच्या दोन फिल्म्स शेवटच्या असतील. पण, आज अचानक त्यानं म्हटलं की, मी मोठा ब्रेक घेतोय. मी संन्यास घेत नाहीय. विक्रांतच्या पोस्टनं गोंधळ आणखीनच वाढवला आहे. पण तुम्हाला माहीत आहे का? सिरिअल्सपासून सुरू करुन आता थेट थिएटर आणि ओटीटी गाजवणारा हा स्टार लग्झरी लाईफ जगतो.
विक्रांत मेस्सीचा समावेश सध्या बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्यांमध्ये केला जातो. कधीकाळी विक्रांतनं चित्रपटांमधून नाहीतर टेलिव्हिजनच्या छोट्या पडद्यापासून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. पण, अवघ्या काही दिवसांतच त्यानं आपल्या अभिनयाची छाप सर्वांच्या मनावर सोडली. टेलिव्हिजनच्या छोट्या पडद्यावरुन विक्रांतनं थेट बॉलिवूड गाठलं आणि आता ओटीटीही गाजवत आहे. नुकताच रिलीज झालेला त्याचा चित्रपट 'द साबरमती रिपोर्ट' चर्चेचा विषय ठरला. या चित्रपटावरुन गदारोळही झाला, विक्रांतला धमक्याही आल्या. दरम्यान, हा चित्रपट देशातील वादग्रस्त प्रकरण गोध्रा घटनेवर आधारित होतं.
पण तुम्हाला माहीत आहे का? विक्रांतनं आतापर्यंतच्या आपल्या करिअरमध्ये भरपूर संपत्ती आणि प्रसिद्धी कमावली आहे. त्याला अनेक महागड्या वस्तूंचा शौकही आहे. त्याच्या नेट वर्थबाबत बोलायचं झालं तर, मीडिया रिपोर्ट्सनुसार, विक्रांतची संपत्ती 20 ते 26 कोटी रुपये आहे. काही रिपोर्ट्सनुसार, विक्रांत मेस्सी त्याच्या एका चित्रपटासाठी 1 ते 2 कोटी रुपये घेतो. आपले चित्रपट आणि वेब सीरिज व्यतिरिक्त ब्रँड एंडोर्समेंट आणि सोशल मीडियावरुन कमाई करतो. एवढंच नाहीतर 2020 मध्ये त्यानं मुंबईत सीफेस अपार्टमेंट खरेदी केलं आहे. आपली पत्नी शितल ठाकरू आणि मुलगा वरदानसोबत विक्रांत मेस्सी याच अपार्टमेंटमध्ये राहतो.
विक्रांतनं एकदा हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत बोलताना सांगितलेलं की, "माझ्या समोर समुद्र आहे आणि 180 डिग्री समुद्राचे दृश्य देखील आहे. इथे मी दररोज नेचर आर्ट पाहतो." मीडिया रिपोर्ट्सनुसार, विक्रांतकडे अनेक लग्झरी गाड्यांचं कलेक्शनही आहे. त्याच्याकडे 1.16 कोटी रुपयांची मर्सिडीज बेंझ जीएलएस आहे. 60 लाख रुपयांची व्होल्वो S90 आणि मारुती स्विफ्ट डिझायर देखील आहे.