मुंबई : 'मीटू' चळवळीमुळे महिलांना आपल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराविरोधात आवाज उठवण्यासाठी बळ मिळत आहे. वरिष्ठ अॅक्शन दिग्दर्शक आणि अभिनेता विकी कौशलचे वडील श्याम कौशल यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप नमिता प्रकाश नावाच्या सहाय्यक दिग्दर्शिकेने केला होता, त्यानंतर श्याम यांनी ट्विटरवरुन जाहीर माफीनामा मागितला आहे.


2006 मध्ये आऊटडोअर शूटच्या वेळी श्याम कौशल यांनी गैरवर्तन केलं, असा दावा नमिता यांनी केला होता. 'बॉलिवूडमधील पुरस्कार विजेते अॅक्शन दिग्दर्शक श्याम कौशल आपल्या रुममध्ये वोडका पिण्यासाठी यावं, म्हणून मला आग्रह करत होते. त्यांच्या बोलण्याची पद्धत पाहता, मी मद्यपान करतच नसल्याचं खोटं सांगितलं. मी मागणी धुडकावून लावली तरीही त्यांचा हेका कायम राहिला. तू काय मिस करत आहेस, तुला समजत नाही, असंही ते म्हणाले. शेवटी त्यांनी आपल्या फोनवर पॉर्न फिल्म सुरु केली. त्यामुळे कोणीतरी हाक मारत असल्याचं भासवून मी तिथून निघून गेले.' असं नमिता यांनी म्हटलं आहे.

'मी तातडीने माझ्या वरिष्ठांना घडल्या प्रकाराबाबत सांगितलं. तेव्हा, उरलेल्या दिवसात स्टंट टीमसोबत मी कधीच एकटी नसेन, याची हमी त्यांनी दिली. काही महिन्यांनंतर कार्यकारी निर्मात्यांनी माझी माफीही मागितली. मात्र हे ज्यांना समजलं होतं, त्या क्रू मेंबर्ससाठी हा तोपर्यंत चेष्टेचा विषय झाला होता' असंही नमिता यांनी सांगितलं.


मला आलेला अनुभव इतरांप्रमाणे पराकोटीचा नव्हता, मात्र महिलांशी गैरवर्तन करणाऱ्या प्रत्येकाचं नाव समोर यायलाच हवं, असंही नमिता यांना वाटतं.

या प्रकारानंतर श्याम कौशल यांनी ट्विटरवरुन जाहीर माफी मागितली आहे. 'मी व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात कायमच चांगली व्यक्ती म्हणून वागण्याचा प्रयत्न करतो. कोणाचाही अनादर करण्याचा किंवा त्यांना दुखवण्याचा माझा इरादा नाही. नकळत मी कोणालाही दुखावलं असेल, तर मी बिनशर्त माफी मागतो. समस्त महिला वर्ग, प्रॉडक्शन हाऊस आणि चित्रपटसृष्टीतील प्रत्येकाची' असं श्याम कौशल यांनी ट्विटरवर लिहिलं आहे.


#MeToo चं वादळ

अभिनेत्री तनुश्री दत्ता ने नाना पाटेकरांविरोधात आरोप केल्यानंतर #MeToo या चळवळीअंतर्गत देशभरातील विविध क्षेत्रातल्या महिलांनी आपल्यावर झालेले लैंगिक अत्याचार, गैरवर्तन यांच्याविषयी आवाज उठवायला सुरुवात केली आहे.

ज्येष्ठ अभिनेते आलोकनाथ यांनी 20 वर्षांपूर्वी बलात्कार केल्याचा गंभीर आरोप 'तारा' मालिकेच्या लेखिका-दिग्दर्शिका विनिता नंदा यांनी केला. कंगना रनौत, सोना मोहापात्रा, हिमानी शिवपुरी, सिमरन कौर सुरी, संध्या मृदुल, पूजा भट्ट, फ्लोरा सैनी, ज्वाला गुट्टा यांनीही आपली आपबिती मीडियासमोर सांगितली होती. दिग्गज अभिनेते नाना पाटेकर, संस्कारी बाबूजी अलोकनाथ, गायक कैलाश खेर, सुभाष घई यांच्यापासून दिग्दर्शक विकास बहल, लेखक चेतन भगत, अभिनेता रजत कपूर अशा अनेक जणांवर आरोप झाले आहेत. अगदी कॉमेडियन अदिती मित्तलवरही महिला कॉमेडियनने गैरवर्तनाचे आरोप केले.

#MeToo चं वादळ त्यानंतर नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातही दाखल झालं. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यमंत्री एम जे अकबर यांच्यावर पत्रकार प्रिया रमानी यांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले. तर बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी यांच्यावरही लैंगिक शोषणाचा आरोप झाला.