मुंबई : मीटू चळवळीमुळे एकीकडे महिलांना आपल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराविरोधात आवाज उठवण्यासाठी बळ मिळत आहे, मात्र याचा गैरफायदा घेणारेही असू शकतात. अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने 'मी टू'चा अनुभव सांगितल्याचं खोटं ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. ऐश्वर्याने नाव न घेता सुपरस्टार सलमान खानकडे अंगुलीर्निदेश केल्याचं यामध्ये दिसतं.
'हो, आधीच्या विखारी रिलेशनशीपमध्ये माझ्यावर अत्याचार झाला, मारहाण झाली आणि कित्येक वेळा धमकावलंही गेलं. बॉलिवूडचा सर्वात मोठा धर्मादाय माणूस जो स्वतःला ह्युमन म्हणवतो, त्याला प्रत्यक्षात अजिबात माणुसकी नाही' असं ऐश्वर्याने लिहिलं असल्याचा खोटा ट्वीट व्हायरल झाला आहे.
@AishwaryaRai या कथित वेरिफाईड अकाऊण्टवरुन ट्वीट झाल्याचा स्क्रीनशॉट पाहायला मिळतो. मात्र ऐश्वर्या मुळात ट्विटरवर नाही. त्यामुळे तिने कुठला ट्वीट केल्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
सलमान आणि ऐश्वर्या 1999 साली डेटिंग करत होते. त्यानंतर ऐश्वर्याने 2002 मध्ये सलमानसोबत ब्रेकअप करत असल्याची जाहीर वाच्यता केली होती. अविश्वास आणि सलमानचा क्रोध यामुळे नातं संपवत असल्याचं ऐश्वर्याने सांगितलं होतं. सलमान शारीरिक आणि मानसिक अत्याचारासोबत शिवीगाळ करत असल्याचा आरोपही त्यावेळी ऐश्वर्याने केला होता. सलमानने मात्र ऐश्वर्याला मारहाण केल्याचा दावा फेटाळून लावला होता. त्यानंतर, 2007 मध्ये ऐश्वर्याने अभिनेता अभिषेक बच्चनसोबत लगीनगाठ बांधली.
'मी नेहमीच अत्याचाराविरोधात आवाज उठवला होता, आणि भविष्यातही तसं करत राहेन, मिस वर्ल्डच्या मंचावर माझ्या हातात माईक आला तेव्हापासूनच... जग लहान होत आहे आणि सोशल मीडियामुळे माणसं जवळ येत आहेत. जगातल्या कुठल्याही भागातील व्यक्ती आपली गोष्ट सांगू शकतो' असं ऐश्वर्या गेल्या मंगळवारी (9 ऑक्टोबर) मीडियाशी बोलताना म्हणाली होती.
ऐश्वर्याप्रमाणे तिचे सासरे अमिताभ बच्चन यांनाही फेक मेसेजचा फटका बसला. माजी मिस इंडिया आणि अभिनेत्री सयाली भगतने बिग बींवर काही वर्षांपूर्वी केलेल्या कथित आरोपांची चर्चा पुन्हा रंगली होती. मात्र, मी बच्चन यांच्यावर गैरवर्तनाचे आरोप केलेले नाहीत, आमची बदनामी थांबा, अशी विनंती सयालीने केली. त्यामुळे सयालीच्या नावे फिरणाऱ्या खोट्या मेसेजमध्ये काहीही तथ्य नसल्याचं सिद्ध झालं.
#MeToo चं वादळ
अभिनेत्री तनुश्री दत्ता ने नाना पाटेकरांविरोधात आरोप केल्यानंतर #MeToo या चळवळीअंतर्गत देशभरातील विविध क्षेत्रातल्या महिलांनी आपल्यावर झालेले लैंगिक अत्याचार, गैरवर्तन यांच्याविषयी आवाज उठवायला सुरुवात केली आहे.
ज्येष्ठ अभिनेते आलोकनाथ यांनी 20 वर्षांपूर्वी बलात्कार केल्याचा गंभीर आरोप 'तारा' मालिकेच्या लेखिका-दिग्दर्शिका विनिता नंदा यांनी केला. कंगना रनौत, सोना मोहापात्रा, हिमानी शिवपुरी, सिमरन कौर सुरी, संध्या मृदुल, पूजा भट्ट, फ्लोरा सैनी, ज्वाला गुट्टा यांनीही आपली आपबिती मीडियासमोर सांगितली होती. दिग्गज अभिनेते नाना पाटेकर, संस्कारी बाबूजी अलोकनाथ, गायक कैलाश खेर, सुभाष घई यांच्यापासून दिग्दर्शक विकास बहल, लेखक चेतन भगत, अभिनेता रजत कपूर अशा अनेक जणांवर आरोप झाले आहेत. अगदी कॉमेडियन अदिती मित्तलवरही महिला कॉमेडियनने गैरवर्तनाचे आरोप केले.
#MeToo चं वादळ त्यानंतर नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातही दाखल झालं. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यमंत्री एम जे अकबर यांच्यावर पत्रकार प्रिया रमानी यांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले. तर बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी यांच्यावरही लैंगिक शोषणाचा आरोप झाला.