Daljeet Kaur Passes Away : पंजाबी सिने-सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री दलजीत कौर (Daljeet Kaur) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. वयाच्या 69 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंजाबच्या अनेक सुपरहिट सिनेंमात दलजीत मुख्य भूमिकेत होत्या. तसेच त्यांनी अनेक हिंदी सिनेमांतदेखील काम केलं आहे.
दलजीत कौर यांनी 10 पेक्षा अधिक हिंदी आणि 70 पेक्षा जास्त पंजाबी सिनेमांत काम केलं आहे. दिल्लीच्या लेडी श्री राम कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर त्यांनी पुणे फिल्म इंस्टीट्यूटमध्ये प्रवेश घेतला. 1976 साली त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. पण पती हरमिंदर सिंह देओल यांच्या अपघाती निधनाने दलजीत कौर यांनी सिनेमात काम करणं बंद केलं. पतीच्या निधनानंतर त्या आजारी पडल्या. त्यानंतर 2001 साली त्यांनी पुन्हा एकदा सिनेसृष्टीत कमबॅक केलं.
दलजीत कौर अनेक सिनेमांत आईच्या भूमिकेत दिसल्या आहेत. 'सिंह वर्सेस कौर' या पंजाबी सिनेमात त्यांनी गिप्पी ग्रेवालच्या आईची भूमिका साकरली होती. दलजीत कौर एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबत कबड्डी आणि हॉकीच्या राष्ट्रीय खेळाडू होत्या. दलजीत कौर यांच्या निधनाने पंजाबी सिनेसृष्टी हादरली आहे. कलाकारांकडून शोक व्यक्त केला जात आहे.
पंजाबी सिनेसृष्टीतील हेमा मालिनी म्हणून दलजीत कौर यांना ओळखले जायचे. गेल्या तीन वर्षांपासून त्यांना ब्रेन ट्यूमरचे निदान झाले होते. आता शुक्रवारी त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. 'मामला गडबड है', 'पटोला', 'सईदा जोगन', 'सरपंच', 'सैदा जोगन, की बनू दुनिया दा', 'पुत जट्टां दे' अशा अनेक सुपरहिट सिनेमांत दलजीत कौर यांनी काम केलं आहे.
दलजीत कौर यांचा जन्म 1953 साली पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथे झाला. गेल्या काही दिवसांपासून त्या मानसिक आजाराचा सामना करत होत्या. आजारामुळे त्या गोष्टी विसरू लागल्या होत्या. त्यामुळे त्यांचा भाऊ त्यांचा सांभाळ करत होता. त्यांच्या शेवटच्या काळातही भावानेच त्यांचा सांभाळ केला. गेल्या 12 वर्षांपासून त्या त्यांच्या भावाकडे राहत होत्या.
संबंधित बातम्या