मुंबई : ज्येष्ठ चित्रपट, टीव्ही आणि नाट्य अभिनेते टॉम अल्टर यांना कर्करोगाचं निदान झालं आहे. अल्टर यांना त्वचेचा कॅन्सर झाला असून तो चौथ्या स्टेजला पोहचला आहे. टॉम अल्टर यांचे पुत्र जेमी यांनी हे वृत्त दिलं आहे. मुंबईतील सैफी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
टॉम अल्टर यांनी वीर-झारा, भेजा फ्राय, विरुद्ध, अलग, बोस, यासरख्या तीनशेपेक्षा अधिक चित्रपटात लहान-मोठ्या भूमिका केल्या आहेत. जुनून, शक्तिमान, जबान संभालके यासारख्या टीव्ही मालिकांतील त्यांच्या व्यक्तिरेखाही गाजल्या आहेत. दप्तर या मराठी चित्रपटातही अल्टर झळकले होते. त्यांनी काही चित्रपटांचं दिग्दर्शनही केलं आहे.
80 च्या दशकात त्यांनी क्रीडा पत्रकारिता केली असून भारतासाठी पदार्पण करण्यापूर्वी सचिन तेंडुलकरची टीव्हीसाठी मुलाखत घेणारे ते पहिलेच मुलाखतकार ठरले आहेत. अल्टर यांनी तीन पुस्तकांचं लेखनही केलं आहे.
कला आणि चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी 2008 मध्ये टॉम अल्टर यांना पद्मश्री पुरस्कारानेही गौरवण्यात आलं आहे.