मुंबई : श्रीदेवींच्या मृत्यूच्या बातमीतून सावरत नाही, तोच आणखी एक धक्का बॉलिवूडला बसला आहे. बॉलिवूडची लाडकी 'शम्मी आंटी' अर्थात ज्येष्ठ अभिनेत्री नर्गिस राबडी यांचं निधन झालं. वयाच्या 87 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बिग बी अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवरुन त्यांना श्रद्धांजली वाहिली.
शम्मी आंटी 64 वर्ष चित्रपटसृष्टीत कार्यरत होत्या. जवळपास दोनशे चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या. शम्मी आंटींच्या विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांना मनमुराद हसवलं.
शम्मी आंटी यांचा जन्म 1931 मध्ये मुंबईतील एका पारसी कुटुंबात झाला. नर्गिस राबडी हे त्यांचं मूळ नाव. त्यांची मोठी बहीण नीना (मनी) राबडी ही फॅशन डिझायनर होती. वयाच्या तिसऱ्याच वर्षी त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. निर्माते-दिग्दर्शक सुलतान अहमद यांच्यासोबत सात वर्षांच्या संसारानंतर दोघांनी घटस्फोट घेतला.
वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी 'उस्ताद पेद्रो' (1949) चित्रपटातून त्यांनी पदार्पण केलं. गायक मुकेश यांची निर्मिती असलेला 'मल्हार' हा त्यांचा सोलो हिरोईन म्हणून पहिला चित्रपट फारसा चालला नाही. मात्र दिलीप कुमार-मधुबाला यांच्यासोबत 'संगदिल'(1952) मध्ये त्या झळकल्या, त्यानंतर शम्मी आंटींनी मागे वळून पाहिलंच नाही.
शम्मी यांचे इल्जाम (1954), पहली झलक (1955), बंदिश (1955), आझाद (1955), हलकू (1956), सन ऑफ सिंदबाद (1955), राज तिलक (1958), कंगन (1959), भाई-बहन (1959), दिल अपना और प्रित पराई (1960) यासारखे चित्रपट गाजले.
कुली नं. 1, खुदा गवाह, अर्थ, हम, द बर्निंग ट्रेन, गोपी किशन, हम साथ साथ है यासारख्या चित्रपटांमध्ये शम्मी आंटी दिसल्या होत्या. 90 च्या दशकात गाजलेल्या देख भाई देख, जबान संभाल के, श्रीमान श्रीमती, कभी ये कभी वो, फिल्मी चक्कर यासारख्या मालिकांमध्येही त्याचं दर्शन घडलं होतं. 'शिरीन फरहाद की तो निकल पडी' या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर त्या अखेरच्या झळकल्या.
आणि शम्मी नाव पडलं...
दिग्दर्शक तारा हरिश यांनी नर्गिस राबडींना 'शम्मी' असं नाव बदलून घेण्यास सुचवलं. त्यावेळी चित्रपटसृष्टीत अभिनेत्री नर्गिसचं वर्चस्व असल्यामुळे नर्गिसची शम्मी झाली. पुढे मायाळू शम्मी बॉलिवूडची लाडकी 'शम्मी आंटी' झाली. 1949 मध्ये तब्बल 500 रुपये महिना इतक्या पगारावर शम्मीने दिग्दर्शकासोबत तीन वर्षांचा करार केला. त्यानुसार दिग्दर्शकाच्या परवानगीविना ती बाहेर चित्रपटात काम करु शकत नव्हती.