श्रीदेवीच्या मृत्यूनंतर अभिनेता अर्जुन कपूरची पोस्ट
एबीपी माझा वेब टीम | 06 Mar 2018 09:28 AM (IST)
अर्जुन कपूरने अमेरिकन लेखक आर. एम. ड्रेक यांचा 'लाईफ कोट' इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.
मुंबई : प्रख्यात अभिनेत्री श्रीदेवीच्या मृत्यूनंतर तिचा सावत्र मुलगा आणि अभिनेता अर्जुन कपूर याने पहिल्यांदाच मौन सोडलं आहे. श्रीदेवीच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर अर्जुनने अमेरिकन लेखक आर. एम. ड्रेक यांचा 'लाईफ कोट' पोस्ट केला आहे. 'तुम्ही थकून हार मानली पाहिजे, यासाठी आयुष्य तुमच्यासमोर संकटांचा डोंगर रचून ठेवतं. पण तुम्ही त्यांना धैर्यानं तोंड देऊन उभे राहता आणि चालता. म्हणून तुम्ही धाडसी आहात' असं अर्जुनने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे. अर्जुन हा बोनी कपूर यांची पहिली पत्नी मोना यांचा मुलगा. मोना यांच्यासोबत फारकत घेऊन बोनी कपूर यांनी 1996 मध्ये श्रीदेवीसोबत संसार थाटला होता. त्यानंतर साहजिकच अर्जुन, त्याची बहीण अंशुला आणि बोनीच्या कुटुंबाचे संबंध ताणले गेले होते. गेली काही वर्ष श्रीदेवीसोबतच्या नात्यातील कटुता अर्जुनने व्यक्त केली होती. मी तिला आई मानत नाही, असं अर्जुन म्हणाला होता. मात्र कठीण प्रसंगात अर्जुनने रुसवे-फुगवे विसरुन आपल्या कुटुंबाची साथ दिली. श्रीदेवीच्या मृत्यूनंतर अर्जुन बोनी कपूर यांना साथ देण्यासाठी थेट दुबईला गेला. सावत्र बहिणी जान्हवी आणि खुशी यांच्यासोबत तो खंबीरपणे उभा राहिला. इतकंच नाही, तर श्रीदेवीच्या अंत्यसंस्काराच्या वेळीही त्याने मुलाप्रमाणे कुटुंबाची साथ दिली. काही दिवसांपूर्वी अर्जुन कपूरच्या एका फॅनने त्याच्या सावत्र बहिणींवर टीका केली होती. अर्जुनची सख्खी बहिण अंशुलाची नजर या कमेंटवर गेली आणि अशाप्रकारच्या ट्रोलिंगमुळे ती नाराज झाली. गप्प न राहता, तिने इन्स्टाग्रामवर या ट्रोलरला उत्तर दिलंच, पण त्याची कमेंटही डीलीट केली