मुंबई : बॉलिवूडचे लोकप्रिय अभिनेते विनोदी अभिनेते असरानी (Asrani) यांचं वयाच्या 84 व्या वर्षी निधन झालं आहे. ते गेल्या पाच दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत होते. असरानी यांचं पूर्ण नाव गोवर्धन असरानी होतं. 1 जानेवारी 1941 ला त्यांचा जन्म जयपूरमध्ये झाला. 1960 ला त्यांचं करिअर सुरु झालं, त्यांनी 400 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांचं विनोदाचं टायमिंग आणि अनोख्या शैलीमुळं ते लोकप्रिय ठरले. शोले चित्रपटातील त्यांचं अंग्रेजो के जमाने के जेलर हा डालयॉग असणारी जेलरची भूमिका लोकप्रिय ठरली. खट्टा मीठा, चुपके चुपके या चित्रपटातील त्यांच्या भूमिका लोकप्रिय ठरल्या.
असरानी यांनी सेंट झेविअर स्कूल, जयपूरमधून शिक्षण घेतल्यानंतर राजस्थान कॉलेजमध्ये पदवी पूर्ण केली. त्यानंतर असरानी यांनी रेडिओ आर्टिस्ट म्हणून काम केलं. असरानी यांच्या पत्नीचं नाव मंजू बन्सल इरानी आहे. असरानी यांनी 2004 मध्ये काँग्रेसचं सदस्यत्व घेतलं होतं. असरानी यांनी सिनेमा क्षेत्रात येण्यासाठी खूप स्ट्रगल करावा लागला, त्यांनी गुड्डी या चित्रपटातून पदार्पण केलं. तो सिनेमा देखील हिट ठरला.
असरानी एका मुलाखतीत म्हणाले होते की त्यांना लोक व्यावसायिक अभिनेता समजत नव्हते, त्यात गुलजार देखील होते. ते म्हणाले होते, गुलजार साहेब यांनी म्हटलं होतं नाही नाही, ते मला व्यावसायिक अभिनेते समजत नव्हते, काही लोक चेहरा कसा आहे. मात्र जेव्हा अभिनयाची छाप पाडली त्यानंतर माग वळून पाहण्याची संधी मिळाली नाही, असं असरानी म्हणाले.
चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर असरानी यांच्याबद्दल बोलताना म्हणाले की,एक अतिशय मोठी यशस्वी कारकीर्द असलेला हा कलाकार होता.ज्यावेळी पुण्याच्या एफटीआय कलाकार हिंदी चित्रपट सृष्टीत आले 1970 च्या दशकाच्या सुरुवातीला, त्यातील असरानी हे विनोदाचं उत्तम टायमिंग असणारे अभिनेते होते. ऋषिकेश मुखर्जी यांच्यासारख्या कल्पक दिग्दर्शकाचा विश्वास संपन्न करणारा अभिनेता असरानी होते, असं दिलीप ठाकूर म्हणाले.
अभिनयाबरोबर असरानी यांनी काही चित्रपटांचं दिग्दर्शन केलं होतं. चला मुरारी हिरो बनने, सलाम मेमसाब, हम नही सुधरेंगे, दिल ही तो है या नावाचा सिनेमा दिग्दर्शित केला होता. त्यात जॅकी श्रॉफचा डबल रोल होता आणि दिव्या भारती आणि शिल्पा शिरोडकर अशा दोन अभिनेत्री त्यात होत्या. गुजराती सिनेमांचं दिग्दर्शन केलं होतं. गेल्या दशकात असरानी यांनी मराठी सिनेमात काम केलं होतं, अशी माहिती दिलीप ठाकूर यांनी असरानी यांच्या कारकिर्दीबाबत दिली.
शोलेतील त्यांचं काम सर्वज्ञात आहे.उत्तम बुद्धिमत्ता असलेला आणि चित्रपट व्यवसायाची ओळख असलेला कलाकार म्हणून असरानी यांच्याकडे पाहता येतं. त्यांनी स्वत :ला अपडेट ठेवलं.राजेश खन्नांच्या चित्रपटात असरानी यांना अनेकदा पाहिलं आहे. राजेश खन्ना आणि त्यांची जोडी अजनबी आणि अनुरोधमध्ये पाहायला मिळते. 1970 आणि 1980 च्या दशकातील आघाडीच्या दिग्दर्शकांसोबत त्यांनी काम केलं, अशी भावना चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर यांनी व्यक्त केली.