मुंबई : ज्येष्ठ दिग्दर्शक आणि अभिनेते डॉ. हेमू अधिकारी याचं दीर्घ आजारानं निधन झालं. मुंबईत शिवाजी पार्कमधील राहत्या घरी वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रंगभूमी, चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही क्षेत्रांमध्ये त्यांचा लीलया संचार होता.


हेमू अधिकारी हे प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीवरील एक अग्रगण्य नाव आहे. 45 नाटकं, 16 मराठी आणि हिंदी चित्रपट आणि सात मालिकांमध्ये हेमू अधिकारी यांनी अभिनय केला होता.

वजूद, लगे रहो मुन्नाभाई, डिटेक्टिव्ह नानी यासारखे चित्रपट आणि संध्याछाया, ढोलताशे, हसवा फसवी यासारख्या नाटकांमध्ये अधिकारी यांनी काम केलं आहे.

व्यवसायाने शास्त्रज्ञ असलेले हेमू अधिकारी लोकविज्ञान, अण्वस्र विरोधी शांतता चळवळीत काम करत होते. रंगकर्मी-सिने अभिनेता यासोबतच ते आपल्या विवेकशील वैज्ञानिक दृष्टिकोनासाठीही ओळखले जायचे.

हेमू अधिकारी यांच्या पश्चात पत्नी, दोन कन्या आणि एक पुत्र असा परिवार आहे.