निवडणूक निकाल २०२६
(Source: ECI/ABP News)
'सूर्यवंशम'ला 19 वर्ष पूर्ण, सेट मॅक्सवर हा सिनेमा सतत का लागतो?
एबीपी माझा वेब टीम | 21 May 2018 12:14 PM (IST)
आजच्याच दिवशी म्हणजेच 21 मे 1999 रोजी सूर्यवंशम सिनेमा प्रदर्शित झाला होता.
मुंबई: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा 'सूर्यवंशम' हा चित्रपट प्रदर्शित होऊन तब्बल 19 वर्ष पूर्ण झाली आहेत. आजच्याच दिवशी म्हणजेच 21 मे 1999 रोजी सूर्यवंशम सिनेमा प्रदर्शित झाला होता. वडिल भानुप्रताप यांच्या इच्छेविरोधात हिरा ठाकूर हा तरुण लग्न करतो. वडिलांच्या दृष्टीने नालायक असलेला हिरा नंतर वडिलांचं मन कसं जिंकतो, ही या सिनेमाची कथा. वडिल आणि मुलगा अशा दुहेरी भूमिकेत अमिताभ बच्चन दिसले होते. अमिताभ यांचा सूर्यवंशम हा दोन दशकापूर्वी म्हणजेच 1997 मध्ये रिलीज झालेल्या सूर्यवंशम याच नावाच्या तामिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक होता. ई. व्ही. व्ही. सत्यनारायण दिग्दर्शित या चित्रपटात अमिताभ यांच्यासोबत जयसुधा, दिवंगत अभिनेत्री सौंदर्या, रचना बॅनर्जी, अनुपम खेर, कादर खान, बिंदू यासारखे कलाकार होते. सेट मॅक्स या वाहिनीवर सूर्यवंशम अनेक वेळा दाखवला जातो. यावरुन सोशल मीडियावर बरेच जोक्स व्हायरल झाले आहेत. त्यामुळे 19 व्या वर्षपूर्तीनिमित्त ट्विटराईट्सच्या सर्जनशीलतेला उधाण आलं आहे. 1999 साली जेव्हा सूर्यवंशम प्रदर्शित झाला, त्याच्या काही वेळ अगोदरच सेट मॅक्स चॅनल लॉन्च झालं होत. काही अनाकलनीय कारणांमुळे त्यांनी सूर्यवंशमचे टेलिकास्ट राईट्स शंभर वर्षांसाठी घेतले होते. आता जेव्हा दुभती गाय विकत घेता, तेव्हा तिच्यापासून जास्तीत जास्त दूध मिळवण्याचा प्रयत्न करणारच. 'सूर्यवंशम ' ही दुभती गाय आहे. त्यामुळेच सूर्यवंशम सातत्याने सेट मॅक्सवर पाहायला मिळतो. ब्लॉग - या 'सूर्यवंशम'चं काय करायचं ?