ठाणे : नव्वदच्या दशकामध्ये मराठीमध्ये अनेक ग्लॅमरस कलाकार होते. हिंदी इंडस्ट्रीत असतं तसं चमचमतं ग्लॅमर त्यांना नसलं तरी तो कलाकार शहरात आला की त्याला बघायला गर्दी होत असे. अशा कलाकारांत आवर्जून गणती होणारे अभिनेते अविनाश खर्शीकर यांचं आज (8 ऑक्टोबर) सकाळी दहाच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने ठाण्यातील राहत्या घरी निधन झालं. ते 68 वर्षांचे होते.
एक चार्मिंग अभिनेता अशी त्यांची इमेज होती. 1978 मध्ये त्यांनी चित्रपसृष्टीत पाऊल ठेवलं. त्यापूर्वी ते नाटकांतून काम करत होतेच. त्यांनी केलेले अनेक सिनेमे गाजले. यात जशास तसे, माझा नवरा तुझी बायको, बकुळा नामदेव घोटाळे, चालू नवरा भोळी बायको, माफीचा साक्षीदार आदी अनेक चित्रपटांत काम केलं. शिवाय रंगभूमीशीही त्यांनी आपली नाळ जोडलेलीच ठेवली. यात सौजन्याची एैशीतैशी, दिवा जळू दे सारी रात, लफडा सदन आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुज आहे तुजपाशी या नाटकांचा त्यात समावेश होतो. तुज आहे तुजपाशी हे नाटक तर विक्रमी म्हणायला हवं.
तुज आहे तुजपाशी या नाटकात अविनाश खर्शीकर श्यामची भूमिका रंगवत होते. या नाटकात श्याम विशीतला होता. ह नाटक सुरु झालं तेव्हा अविनाश दिसायला देखणे आणि श्यामच्या भूमिकेला चपखल बसणारे होते. त्यांच्या भूमिकेवर रसिकांनी उदंड प्रेम केलं. या नाटकाचे विक्रमी प्रयोग झाले. जवळपास ३० वर्षं या नाटकाचे प्रयोग चालू होते. हे सर्व प्रयोग श्याम वठवला तो अविनाश खर्शीकर यांनीच.
त्यांच्या निधनाची बातमी कळल्यानंतर सुकन्या मोने, विजू माने, रेणुका शहाणे, अमोल कोल्हे आदी अनेकांनी दु:ख व्यक्त केलं. त्यांनी काही मालिकांमध्येही काम केलं. यात उल्लेख करायला हवा तो दामिनी या मालिकेचा. नव्वदच्या दशकात अत्यंत चार्मिंग दिसणारा अभिनेता म्हणून त्यांची गणना केली जायची. अलिकडच्या काळात शेमारु या कंपनीसाठी ते कार्यरत होते. अगदी दोन दिवसांपूर्वी पर्यंत ते नव्या नियोजनात व्यग्र होते. पण आज सकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांची प्राणज्योत मालवली.
Avinash Kharshikar | 'तुज आहे तुजपाशी' फेम अभिनेते अविनाश खर्शीकर यांचं निधन