मुंबई : अनलॉक इंडियाची प्रक्रिया जशी सुरू झाली तशी अनेक उद्योगांना पुन्हा एकदा नवी आशा लागली आहे. पुन्हा एकदा सगळं स्थिरस्थावर होईल. पुन्हा एकदा गाडी रुळावर येईल अशी आशा बाळगली जाते आहे. मनोरंजनसृष्टीही त्याला अपवाद नाही. जशी थिएटर्स सुरू होतील तसं सिनेमांचं नवं वेळापत्रकही येईल. त्यामुळे ज्यांचे सिनेमे जवळपास पूर्ण आहेत अशांची लगबग सुरू झाली आहे. अशा सिनेमांमध्ये समावेश होतो कुली नंबर 1 या सिनेमाचा.

Continues below advertisement


डेव्हिड धवन दिग्दर्शित कुली नंबर 1 या सिनेमाचा हा नवा सिनेमा रिमेक आहे. यापूर्वी डेव्हिड यांनी आपला मुलगा वरुण धवन याला सोबत घेऊन जुडवा पुन्हा एकदा तयार केला होता. त्यात सलमानच्या जागी वरूण होता. तर करिष्मा आणि रंभाच्या जागी होत्या तापसी पन्नू आणि जॅकलिन फर्नांडिस. तर आता कुली नंबर 1 हा चित्रपट बनून पूर्ण आहे. हा सिनेमा रिलीज करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. पण हा सिनेमा नक्की कुठे रिलीज करायचा यावर डेव्हिड धवन आणि वरुण धवन यांच्यात मतभेद झाल्याचं दिसतं आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते असलेले डेव्हिड यांना वाटतं हा सिनेमा ओटीटीवर आता यायला हवा. या  चित्रपटाचे आणखी एक निर्माते वाशू भगनानी यांनाही हा सिनेमा ओटीटीवर यावा असं वाटतं. पण त्या पलिकडे वरुणला मात्र तसं वाटत नाही.


वरुणच्या मतानुसार हा चित्रपट थिएटरवर यायला हवा. ओटीटीवर सिनेमा आणू नये निदान आत्ता तरी आणू नये असं त्याचं म्हणणं. गेल्या काही महिन्यांपासून ओटीटीवर आलेल्या सिनेमांचा व्यवसाय बघता असं वाटणं स्वाभाविक आहे. शिवाय सुशांतच्या मृत्युूनंतर इंडस्ट्रीला नेपोटिझमवरून बरंच काही झेलावं लागलं आहे. अशात हा सिनेमा रिलीज करू नये असं त्याला वाटतं. यापूर्वी ही चर्चा दबकी होती. पण आता बॉलिवूड जगतात या मतभेदांची चर्चा उघड होते आहे. याला अधिकृत असा दुजोरा मात्र धवन कुटुंबियांपैकी कुणीही दिलेला नाही.