मुंबई : 'वीरे दि वेडिंग' या सोनम कपूर, करिना कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया यांची मुख्य भूमिका असलेल्या 'वुमन सेंट्रिक' चित्रपटाने पहिल्याच दिवशी छप्परफाड कमाई केली आहे. 'वीरे..' ने बॉक्स ऑफिसवर 10 कोटी 70 लाख रुपयांचं कलेक्शन केलं आहे.


शशांक घोष दिग्दर्शित, एकता कपूरची सहनिर्मिती असलेला 'वीरे दि वेडिंग' हा चित्रपट शुक्रवार 1 जून 2018 रोजी प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी या सिनेमाने देशभरात 10.7 कोटींचा गल्ला जमवला. लग्नाच्या निमित्ताने पुन्हा भेटलेल्या चार मैत्रिणींची ही गोष्ट आहे.

एकता कपूरने कमाईचे आकडे ट्वीट करुन आनंद व्यक्त केला आहे. सिनेमा फक्त तीन गोष्टींवर चालतो - एन्टरटेनमेंट, एन्टरटेनमेंट और एन्टरटेनमेंट... असं तिने ट्वीट केलं आहे. सोनम आणि स्वरा भास्कर यांनीही पहिल्या दिवशी कमाईचे आकडे 'डबल डिजीट'मध्ये गेल्याचा आनंद व्यक्त केला आहे.


'वीरे दि वेडिंग' पहिल्या दिवशी 4.5 कोटींची कमाई करेल, असा अंदाज फिल्म ट्रेड अॅनलिस्ट गिरीश जोहर यांनी रिलीजपूर्वी व्यक्त केला होता. 'राझी, क्वीन, पद्मावत अशा चित्रपटांमुळे महिलाकेंद्री चित्रपटही प्रेक्षकांना रुचत असल्याचं दिसत आहे. मग तो सिनेमा गंभीर असो, विनोदी किंवा अॅक्शनपट... विषय चांगला असेल, तर प्रेक्षक कौतुक करतात', असं जोहर यांना वाटतं.




शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान, अमिताभ बच्चन किंवा अक्षय कुमार यांच्यासारखे सुपरस्टार असतील, तर सिनेमांना पहिल्या दिवशी मोठी ओपनिंग मिळते. मात्र कुठलाही मोठा स्टार नसताना, मुख्य भूमिकेत चार महिला कलाकार असताना दमदार ओपनिंग मिळणं कौतुकास्पद मानलं जात आहे.

वीरे दि वेडिंगने पहिल्या दिवशी चांगला गल्ला जमवल्यामुळे वीकेंडला सिनेमा चांगली कमाई करेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.