ठाणे : आयपीएल सामन्यांवरील बेटिंग प्रकरणात ठाणे खंडणीविरोधी पथकाने आज अभिनेता अरबाज खानला समन्स बजावलं. या प्रकरणात अरबाजची चौकशी होणार असून उद्या तो ठाणे खंडणीविरोधी पथकाच्या कार्यालयात हजेरी लावणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ठाणे खंडणीविरोधी पथकाने काही दिवसांपूर्वी आयपीएल सामन्यांवर सुरु असलेलं ऑनलाईन बेटिंगचं रॅकेट उघड करत डोंबिवलीतून तिघांना अटक केली होती. त्यानंतर या तिघांच्या चौकशीत हे रॅकेट देशातला आघाडीचा बुकी सोनू जालान उर्फ सोनू मालाड हा चालवत असल्याचं समोर आल्याने पोलिसांनी सोनूला बेड्या ठोकल्या.

सोनूच्या चौकशीत अभिनेता अरबाज खान हा देखील सोनूकडे बेटिंग करत असल्याची माहिती समोर आली. यानंतर शुक्रवारी पोलिसांनी अरबाज खानला चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावलं.

अरबाज खान उद्या चौकशीसाठी ठाणे खंडणीविरोधी पथकाच्या कार्यालयात हजर राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, सोनूच्या संपर्कात देशातले 80 ते 90 बडे बुकी आणि अनेक सेलिब्रेटी असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे लवकरच खंडणीविरोधी पथकाच्या कार्यालयात बड्या असामींची हजेरी लागण्याची शक्यता आहे.