मुंबई : अभिनेता वरुण धवनची गर्लफ्रेंड नताशा दलाल हिला जीवे मारण्याची धमकी वरुनच्या एका चाहतीने दिली आहे. वरुण धवन सध्या त्याच्या 'कलंक' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे वरुणला त्याच्या चाहत्यांना भेटायला वेळ मिळत नाही. वरुणला बरेच दिवस न भेटल्याने निराश झालेल्या एका महिला फॅनने वरुणच्या घराबाहेर गोंधळ घातला. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.


वरुण नेहमीच त्याच्या चाहत्यांना भेटत असते. त्यामुळे त्याच्या चाहत्यांनाही त्याची सवय झाली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून व्यस्त असल्याने वरुण त्याच्या या महिला चाहतीला भेटू शकला नव्हता. यावरुन नाराज होऊन तिथे थेट वरुणच्या गर्लफ्रेंडला जीवे मारण्याची धमकी दिली.


वरुणच्या सुरक्षारक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, वरुणच्या घरासमोर त्याची एक चाहती त्याला भेटण्यासाठी आली होती. वरुण त्याच्या चाहत्यांना आवर्जुन भेट देतो, त्यांच्यासोबत फोटो काढतो. मात्र त्यादिवशी वरुणला त्या चाहतीला भेटणे शक्य झालं नाही. त्यावेळी सुरक्षारक्षकांनी तिला तेथून जाण्यास सांगितलं. मात्र ती बराच वेळ तिथेच थांबली आणि वरुणला भेटण्याचा हट्ट करु लागली.


मात्र वरुणची भेट होत नाही, यावरुन चिडलेल्या त्या चाहतीने स्वत:ला मारुन घेण्याची धमकी दिली. मात्र सुरक्षारक्षकांनी काहीच प्रतिसाद न दिल्याने तिने वरुणची गर्लफ्रेंड नताशाला जीवे मारण्याची धमकी दिली. या धमकीची गंभीर दखल घेत सांताक्रुज पोलीस ठाण्यात या महिला चाहतीविरोधात तक्रार दाखल करण्यात आहे. मात्र वरुण धवनच्या प्रतिक्रियेशिवाय या महिलेविरोधात गुन्हा दाखल करता येणार नसल्याचं पोलिसांनी सागितलं आहे.