मुंबई पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका साकारणारा अभिनेता विवेक ओबेरॉय राजकारणात प्रवेश करणार का याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती. अखेर विवेक ओबेरॉयने याबाबतीत आपले मौन सोडले आहे. विवेक ओबेरॉयने आपण भविष्यात राजकारणात प्रवेश केला तर वडोदरामधून लोकसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक असल्याची इच्छा व्यक्त केली आहे.


ओमंग कुमार दिग्दर्शित ‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त विवेकने पारुल विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्याने भविष्यात वडोदरामधून निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवली.  तसेच गुजरातमधील सत्तारुढ भाजपच्या 40 स्टार प्रचारकांमध्ये विवेक ओबेरॉयचं नाव सामील आहे. या 40 स्टार प्रचारकांमध्ये अभिनेत्री हेमा मालिनीसह अभिनेते परेश रावल यांचासुद्दा समावेश आहे.

तसेच 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपट कधी प्रदर्शित होणार यावरुन प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. तसेच चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगानेच अंतिम निर्णय घ्यावा, असे स्पष्ट मत मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. आचारसंहितेच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बायोपिक प्रदर्शित होत असल्याचा विरोध करत आरपीआय(आय) चे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश गायकवाड यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. यावर हायकोर्टाने आपले मतं मांडले.

येत्या पाच एप्रिलला चित्रपट देशभरात होणार प्रदर्शित होणार असून अभिनेता विवेक ओबेरॉय हा नरेंद्र मोदींच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. टीव्ही अभिनेत्री बरखा बिष्ट जशोदाबेन, तर अभिनेते मनोज जोशी अमित शाह यांच्या भूमिकेत दिसतील. याशिवाय बमन इराणी, ​झरीना वहाब, सुरेश ओबेरॉय, प्रशांत नारायणन यासारखे कलाकार मुख्य भूमिकेत असतील.

सरबजीत, मेरी कोम सारख्या चरित्रपटाचे दिग्दर्शक ओमंग कुमार या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार असून संदीप सिंग या सिनेमाची निर्मिती करणार आहेत.