नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारला पाठिंबा आणि विरोध यावरुन बॉलिवूडमध्ये दोन गट निर्माण झाले आहेत. बॉलिवूडमधील काही कलाकारांना एकत्र येत भाजप सरकारला मतदान न करण्याचं आवाहन केलं होतं. यावरुन अभिनेते अनुपम खेर आणि अभिनेत्री स्वरा भास्कर आमने-सामने आले आहेत.


बॉलिवूडमध्ये भाजप समर्थक आणि भाजप विरोधी असे दोन गट निर्माण झाले आहेत. काही दिवसांपूर्वी जवळपास 600 सिनेनिर्मात्यांनी एकत्र येत मोदी सरकारला मतदान करु नका, असं आवाहन देशातील जनतेला केलं होतं. यानंतर मोदी सरकारला उघड पाठिंबा देणारे अभिनेते अनुपम खेर हे या सर्वांविरोधात उभे राहिले आणि हे सर्व जण विरोधीपक्षासाठी काम करत असल्याचा आरोप केला.





अनुपम खेर यांनी ट्वीट केलं की, "माझ्या बिरादरीतील काही लोक सध्या संविधानिक प्रक्रियेतून निवडून दिलेल्या सरकारला मतदान न करण्याचं आवाहन जनतेला करत आहेत. दुसऱ्या शब्दात हे सर्वजण विरोधी पक्षाचा प्रचार करत आहेत. किमान इथे कोणताही देखावा नाही."





अमुपम खेर यांच्या या ट्वीटला अभिनेत्री स्वरा भास्करने उत्तर दिलं. स्वराने ट्वीटमध्ये म्हटलं की, "सर याला लोकशाही म्हणतात... भारत माता की जय!"   अभिनेत्री आलिया भट्टची आई सोनी राजदान यांनीही अनुपम खेर यांना उद्देशून ट्वीट करत म्हटलं की, "जर तुम्ही सध्याच्या सरकारला स्वत: सोबत जोडू शकता, तर तुम्हाला काय वाटतं इतर लोक काही वेगळं करत आहेत?"





काही दिवसापूर्वी नसरुद्दीन शाह, अमोल पालेकर यांच्यासह बॉलिवूडमधील जवळपास 600 कलाकारांनी एकत्र येत लोकसभा निवडणुकीत भाजपला मतदान करु नका असं आवाहन केलं होतं. या कलाकारांनी Artist Unite India या वेबसाईटवर एका पोस्टद्वारे हे आवाहन केलं होतं. त्यानंतर हे ट्वीट वॉर सुरु झालं आहे.