मुंबई : प्रसिद्ध गायक उदीत नारायण यांचा मुलगा आदित्य नारायणला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. रॅश ड्रायव्हिंग करत रिक्षाला धडक दिल्यामुळे मुंबईतील वर्सोवा पोलिसांनी ही कारवाई केली. या अपघातात रिक्षातील प्रवासी महिला आणि रिक्षा चालक गंभीर जखमी झाले आहेत.



अंधेरीतील लोखंडवालाजवळ ही घटना घडली. अपघातानंतर आदित्य नारायणने दोन्ही जखमींना रुग्णालयात दाखल केलं. मात्र अपघातात जखमी झालेल्या महिलेने त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी कलम 279 आणि 338 अंतर्गत गुन्हा दाखल करत आदित्यला अटक केली. मात्र काही तासातच दहा हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्याची जामिनावर सुटकाही करण्यात आली.



27 वर्षीय जखमी महिलेचं नाव सुरेखा अंकुश शिवेकर असं आहे. तर जखमी रिक्षा चालकाचं नाव राजकुमार बाबूराव असून ते 64 वर्षांचे आहेत. कोकिळाबेन रुग्णालयात ते सध्या व्हेंटिलेटरवर आहेत.

आदित्य नारायण हा स्वतःही गायक आहे. बॉलिवूडच्या अनेक सिनेमांसाठी त्याने गाणी दिली आहेत. याशिवाय काही सिनेमांमध्ये त्याने अभिनेता म्हणूनही काम केलं आहे. 2010 साली शापित या हॉरर सिनेमातून त्याने पदार्पण केलं होतं. सध्या तो रिअॅलिटी शोमध्ये अँकरिंग करत आहे.