मुंबई : बॉलिवूड अभिनेता वरुण धवनच्या आगामी 'ऑक्टोबर' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. 2 मिनिट 23 सेकंदाचा ट्रेलर पाहून स्पष्ट आहे की, हा चित्रपट त्याच्या मागील चित्रपटांपेक्षा फारच वेगळा आहे. यामध्ये वरुणचा अंदाज निराळा आहे. तो कुठेतरी हरवल्यासारखा दिसत आहे.


दिग्दर्शक शूजित सरकारचा हा सिनेमा 13 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. सिनेमातील व्यक्तिरेखा खरीखुरी वाटण्यासाठी वरुण एक आठवडा झोपला नाही. व्यक्तिरेखा पूर्णत: जिवंत वाटण्यासाठीच शूजित सरकारने त्याला असं करण्यास सांगितलं होतं.

या सिनेमात आयुष्याच्या अनेक छटा पाहायला मिळणार आहेत. "हा रोमँटिक चित्रपट नाही तर प्रेमासाठी घेतलेल्या ठोस पावलावर आधारित सिनेमा आहे," असं शूजित सरकारने आधीच सांगितलं होतं.

वरुणसोबत सिनेमात बनिता संधू दिसणार आहे. वरुण धवन आणि शूजित सरकार एकत्र काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे. "अभिनेता आणि माणूस म्हणून ह्या चित्रपटाचं शूटिंग माझ्यासाठी आयुष्य बदलवणारा अनुभव होता. शूजित दा योग्य वेळी माझ्या आयुष्यात आले यासाठी मी आभारी आहे. ह्या सिनेमाने मला बदललं," असं वरुण धवन म्हणाला.

पाहा ट्रेलर