Varhadi Vajantri: खरं तर दिवाळी झाल्यावर तुळशीच्या लग्नापासून संपूर्ण महाराष्ट्रभर विवाह सोहळ्यांची धूम सुरू होते, पण यंदा दिवाळीपूर्वीच 'वऱ्हाडी वाजंत्री'चा (Varhadi Vajantri) गाजावाजा होऊ लागला आहे. अभिनेते-दिग्दर्शक विजय पाटकर यांनी दिग्दर्शित केलेल्या 'वऱ्हाडी वाजंत्री' या आगामी मराठी चित्रपटाची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे. उत्सुकता वाढवणाऱ्या या चित्रपटातील गाणीही संगीतप्रेमींच्या मनाचा ठाव घेणारी आहेत. महाराष्ट्राचा लाडका अभिनेता मकरंद अनासपुरेसंगे चित्रपटातील इतर कलाकारांनी धरलेल्या 'वऱ्हाडी वाजंत्री'च्या ठेक्यावर महाराष्ट्रातील तमाम सिनेप्रेमींचे पाय थिरकणार आहेत.


या चित्रपटाच्या म्युझिक लाँचसाठी अनोखी शक्कल लढवत संगीतकार अविनाश - विश्वजित, शशांक पोवार आणि लोकशाहीरी कला जोपासणारे, बाजीराव मस्तानी, तानाजी द अनसंग वारीअर अश्या अनेक चित्रपटांत पार्श्वगायन करणारे आणि मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे प्रमुख आणि वऱ्हाडी वाजंत्री हे टायटल साँग गायलेले हरहुन्नरी कलावंत डॉ. गणेश चंदनशिवे यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. 'वऱ्हाडी वाजंत्री' हे शीर्षक गीत वाद्य सुरावटीद्वारे प्रत्यक्ष सादर करीत त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले.


कलाकार मंडळींची हजेरी


या अनोख्या सोहळ्यात सर्व गायक, संगीतकार आणि कलाकारांनी सहभाग घेत शोभा वाढवली. संगीत प्रदर्शनानंतर या चित्रपटाचा खुमासदार ट्रेलर आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते मकरंद अनासपुरे, पंढरीनाथ कांबळी, विजय कदम, जयवंत वाडकर, आनंदा कारेकर, पूर्णिमा अहिरे, राजेश चिटणीस, शिवाजी रेडकर, आशुतोष वाडेकर, शीतल कलाहपुरे, निर्माते कॅप्टन कल्पेश रविंद्र मगर, सहनिर्माते अतुल राजारामशेठ, दिग्दर्शक विजय पाटकर यांच्या उपस्थितीत प्रदर्शित होताच सभागृहात हास्याचे कारंजे फुलू लागले होते.


'वऱ्हाडी वाजंत्री' या चित्रपटात तीन सुमधूर गाणी असून, अविनाश-विश्वजीत व शशांक पोवार या संगीतकार त्रयींनी ती संगीतबद्ध केली आहेत. 'वऱ्हाडी वाजंत्री' हे टायटल साँग शशांक पोवार यांनी संगीतबद्ध केलं असून, गीतकार राजेश बामुगडे हे तिन्ही गीतांचे गीतकार आहेत. लोकप्रिय गायक आदर्श शिंदे, नंदू भेंडे, आनंदी जोशी, मैथिली पानसे–जोशी, गणेश चंदनशिवे यांनी ती गायली आहेत.


पाहा ट्रेलर :


 






मराठीतला मल्टीस्टारर चित्रपट


वैभव अर्जुन परब लिखित ‘वऱ्हाडी वाजंत्री’ या चित्रपटातील प्रमुख भूमिकेत असलेल्या मकरंद अनासपुरेंसोबत अभिनेते मोहन जोशी, रीमा लागू, पंढरीनाथ कांबळी, हेमांगी कवी, विजय कदम, प्रिया बेर्डे, जयवंत वाडकर, आनंदा कारेकर, सुनील गोडबोले, पूर्णिमा अहिरे, गणेश रेवडेकर, प्रभाकर मोरे, राजेश चिटणीस, प्रशांत तपस्वी, विनीत बोंडे, शिवाजी रेडकर, आशुतोष वाडेकर, शीतल कलाहपुरे, साक्षी परांजपे इत्यादी कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. 'वऱ्हाडी वाजंत्री' हा चित्रपट 11 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे.


हेही वाचा :


Entertainment News Live Updates 20 October: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!