'उरी : दी सर्जिकल स्ट्राईक' शंभर कोटी क्लबमध्ये
एबीपी माझा वेब टीम | 20 Jan 2019 04:27 PM (IST)
'उरी - दी सर्जिकल स्ट्राईक' हा चित्रपट 4 जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. गेल्या दहा दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर 'उरी'चीच धूम पहायला मिळत आहे. 'उरी' हा चित्रपट 2019 या वर्षातला पहिला ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे.
मुंबई : 'उरी - दी सर्जिकल स्ट्राईक' हा चित्रपट 4 जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. गेल्या दहा दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर 'उरी'चीच धूम पहायला मिळत आहे. 'उरी' हा चित्रपट 2019 या वर्षातला पहिला ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे. दहा दिवसात या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 100 कोटी रुपयांची कमाई केली आहे. विकी कौशल आणि यामी गौतम स्टारर 'उरी' प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 'उरी'ने 8.20 कोटी रुपये, दुसऱ्या दिवशी (शनिवारी) चित्रपटाने 12.43 कोटी रुपये कमावले. चित्रपटाच्या कमाईत तिसऱ्या दिवशी (रविवारी) अजून वाढ झाली. चित्रपटाने तिसऱ्या दिवशी 15.10 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. तीन दिवसांत चित्रपटाने 35 कोटी रुपयांचा टप्पा पार केला. विकेंडनंतर सोमवारी चित्रपटाने 10.51 कोटी, मंगळवारी 9.57 कोटी, बुधवारी 7.73 कोटी, गुरुवारी 7.40 कोटी, शुक्रवारी 7.66 कोटी, शनिवारी मोठी झेप घेत 13.24 कोटी रुपयांची कमाई केली. आज चित्रपटाने 10 कोटींहून अधिक कमाईक करत 100 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे.. ‘ये हिंदुस्तान चुप नहीं बैठेगा, ये नया हिंदुस्तान है. ये घर मै घुसेगा भी और मारेगा भी’, असं म्हणत ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटातून भारतीय जवानांनी पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकची शौर्यगाथा सांगण्यात आली आहे. चित्रपटाचे प्रेक्षकांसह समीक्षकांकडून कौतुक होत आहे. जम्मू- काश्मीरमधील 'उरी' येथे भारतीय लष्कराच्या कॅम्पवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. त्यानंतर भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिरून सर्जिकल स्ट्राईक केला होता. उरी हा चित्रपट याच सत्य घटनेवर आधारित आहे. उरी हा चित्रपट केवळ 25 कोटी रुपयांच्या बजेट मध्ये तयार करण्यात आला आहे. त्यामुळे चित्रपटाने तीनच दिवसांत गुंतवलेली रक्कम वसूल केली आहे. चित्रपटात विकी कौशल, यामी गौतमसह परेश रावल, मोहित रैना, कीर्ती कुल्हारी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.