Majha Katta : अॅनिमल चित्रपटात ज्यावेळी फ्रेडी पाटलाच्या (Freddy Patil) भूमिकेसाठी दिग्दर्शकाच्या मनात पहिला विचार आला त्यावेळी पहिलं नाव हे आपलं आल्याचं सांगत उपेंद्र लिमये (Upendra Limaye) याने अनेक मजेदार किस्से सांगितले. आतापर्यंत केलेल्या ऑफबिट भूमिकांमुळे आपल्याला ही भूमिका मिळाली आणि त्याच पद्धतीने काम करून आपण त्याचं चीज केलं असंही तो म्हणाला. तो एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात बोलत होता. 


बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरलेल्या अॅनिमल या सिनेमातील फ्रेड्री पाटील ही उपेंद्र लिमये यांनी साकारलेली भूमिका सध्या सोशल मिडियावर प्रचंड चर्चेत आहे. जोगवा, मुळशी पॅटर्न अशा मराठी तर चांदनी बार, पेज थ्री अशा हिंदी सिनेमांमधून त्यांच्या प्रभावी अभिनयाची ओळख मराठी, हिंदी प्रेक्षकांना तर झालीच. पण दाक्षिणात्य सिनेमामध्येही उपेंद्र लिमयेंनी प्रवेश केला. उपेंद्र लिमयेंच्या भूमिका या त्यांच्या लांबीसाठी नाही तर खोलीसाठी ओळखल्या जातात. 


ऑफबिट भूमिका म्हणून अॅनिमलमध्ये भूमिका 


व्यावसायिक चित्रपटांपेक्षा समांतर वा ऑफबिट भूमिकेसाठी मला काम करायला जास्त आवडते. त्यामुळे अॅनिमल चित्रपटामध्ये काम करण्यासाठी मला निवडण्यात आलं असं उपेंद्र लिमये म्हणाला. तो म्हणाला की, अॅनिमल चित्रपटाचा दिग्दर्शक संदीप रेड्डी याने फ्रेडी पाटील या भूमिकेसाठी माझं नाव फायनल केलं. त्यावेळी त्याने त्याच्या सहाय्यकाला सांगितलं की, उपेंद्र लिमये कुठे आहे तिथे त्यांच्याशी संपर्क कर. ते परदेशात शूटिंग करत असतील तर लगेच त्यांच्याशी संपर्क करून या भूमिकेसाठी तयार कर. पण त्यांना कुठे माहिती होतं मी इथेच मुंबईत होतो. त्यांच्या या भोळेपणाबद्दल मी माझ्या बायकोला आणि मित्रांना सांगितलं. 


अॅनिमलचा तो सीन व्हायरल 


अॅनिमलमधील व्हायरल झालेल्या सीनबद्दल बोलताना उपेंद्र लिमये म्हणाला की, माझे वडील अत्यंत कडक शिस्तीचे होते. आम्ही काही मुर्खपणा केला तर ते खूप झापायचे आम्हाला. त्यावेळी ते आमची जी काही नक्कल करायचे तर ती मजेदार असायची. नेमकी तिच आठवण उचलून मी फ्रेडी पाटलाची भूमिका केली, वेगळा आवाज काढला. अॅनिमलच्या सेटवर जो वेगळा आवाज काढला तो इतका व्हायरल झाला की त्यावेळी सेटवर सगळे तसाच आवाज काढायला लागले. चित्रपट रीलिज झाल्यानंतरही तो सीन प्रचंड व्हायरल झाला. 


सध्याच्या चित्रपटांतील दृश्यांवर त्यावर अनेक घटकांतून चिंता व्यक्त केली जाते. त्यावर बोलताना उपेंद्र लिमये म्हणाला की, प्रत्येक कलाकृती ही सगळ्यांनाच आवडेल असं नाही. असं म्हटलं जातंय की तमाशाने माणूस बिघडत नाही आणि कीर्तनाने तो सुधारत नाही. त्यामुळे आता काय होणार भारतीय चित्रपटसृष्टीचे असा प्रश्न जरी काहींना पडला असला तरी त्याने काहीही फरक पडणार नाही.


पहिला ब्रेक विनय आपटेने दिला 


विनय आपटेंच्या मदतीने आपल्या व्यावसायिक करिअरची सुरूवात झाल्याचं उपेंद्र लिमयेने सांगितलं. विनय आपटे यांनी मधुर भांडारकर यांच्या चांदणी बारमध्ये मला संधी मिळवून दिली. चांदणी बार रीलिज झाल्यानंतर मधुर भांडारकर हा रातोरात फेमस झाला. पण त्यानंतर मधुर भांडारकरने पुन्हा संधी दिली. 


जोगवा चित्रपटातील भूमिका ड्रीम रोल


जोगवा चित्रपटातील भूमिकेसाठी उपेंद्र लिमये यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यावर बोलताना उपेंद्र लिमये म्हणाला की, जोगवानंतर मला मोठ्या अपेक्षा होती. पण वाईट नाही पण खूप काही अपेक्षित काम झालं नाही. जोगवानंतर ज्या पद्धतीचे चित्रपट मिळायला हवे होते ते मला मिळाले नाही. पण जोगवा चित्रपटातील भूमिका मला मनापासून करायला आवडली. तो माझ्यासाठी ड्रीम रोल ठरला. 


जोगवाला प्रादेशिक मर्यादा होत्या. पण अॅनिमलमधी फ्रेडी पाटील ही भूमिका आता जगभर पोहोचली आहे. कलाकार म्हणून मला वाटतंय की जोगवामधून भूमिका तशी पोहोचली असती तर ती अधिक चांगली झाली असती असं कधीतरी वाटतंय. 


ही बातमी वाचा: