मुंबई: नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच दिग्दर्शक संजय जाधवचा ये रे ये रे पैसा हा सिनेमा रिलीज होतोय.

दुनियादारी नंतर संजय जाधवला यशाची तशी चव चाखता आलेली नाही. ती कसर ये रे ये रे पैसा भरुन काढेल अशी आशा आहे.थोडक्यात नव्या वर्षाचा श्रीगणेशा दमदार व्हावा अशी अवघ्या इंडस्ट्रीची इच्छा आहे.

अजय नाईकचा हॉस्टेल डेजसुद्धा वर्षाच्या सुरुवातीलाच भेटीला येतोय. अतरंगी मित्रांची सतरंगी कहाणी हा सिनेमा आपल्याला सांगेल.

यावर्षी साऱ्यांचं खास लक्ष असेल ते अजय देवगणची निर्मिती असलेल्या 'आपला मानूस' या सिनेमावर.

सतीश राजवाडेचं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमात नाना पाटेकर मुख्य भूमिकेत आहे.

फास्टर फेणेचा सिक्वेल

2017 मध्ये चांगला व्यवसाय करणारा 'फास्टर फेणे' नव्या वर्षात पुन्हा एकदा आपल्याला भेटणार आहे. 'फास्टर फेणे'च्या सिक्वेलवर काम सुरु झालं असून सगळ्या गोष्टी जुळून आल्या तर हा सिनेमा 2018 मध्ये रिलीज होऊ शकतो.

मुंबई-पुणे-मुंबई 3

मुंबई-पुणे-मुंबई या सिनेमाला मिळालेल्या जबरदस्त यशानंतर मुंबई-पुणे-मुंबई 2 चा घाट निर्मात्यांनी घातला आणि त्यात ते यशस्वीही झाले. त्याच बळावर आता मुंबई-पुणे-मुंबई 3 ची जोरदार तयारी सुरु आहे. शूटिंग सुरु झालं असून गौरी आणि गौतमची ही जोडी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालीय.

बबन भेटीला

ख्वाडा या पहिल्याच सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार पटकवणारा भाऊ कऱ्हाडे आता बबन हा सिनेमा घेऊन आपल्या भेटीला येतोय.

खरंतर हा सिनेमा 2017 मध्येच रिलीज होणार होता पण सेन्सॉरच्या 68 दिवसांच्या नियमामुळं त्याला सर्टिफिकेट मिळू शकलं नाही. त्यामुळे नव्या वर्षात या 'बबन'कडेही साऱ्यांचं लक्ष असेल.

शिवाजी पार्क

महेश मांजरेकरांचा शिवाजी पार्क हा मल्टीस्टारर सिनेमाही या वर्षात रिलीज होईल. या सिनेमातली जबरदस्त स्टारकास्ट हाच या सिनेमाचा सगळ्यात मोठा यूएसपी. काही दिवसांपूर्वी याच स्टारकास्टचा मेळ जमवता जमवता मांजरेकरांना घाम फुटला होता. त्यामुळे या सिनेमाचं काम थांबलंही होतं. पण आता शूटिंग पूर्ण झालंय.

दिल दिमाग बत्ती

दिल दिमाग बत्ती या आणखी एका सिनेमाकडे साऱ्यांचं लक्ष असेल, कारण या सिनेमातलं कॉम्बिनेशन. दिलीप प्रभावळकर आणि सोनाली कुलकर्णी यात मुख्य भूमिकेत आहेत.

रवी जाधवचा रंपाट

रवी जाधवसाठी हे वर्ष महत्वाचं असेल. त्याचा रंपाट हा सिनेमा याच वर्षी रिलीज होईल. झी स्टुडिओजकडे हा सिनेमा आहे.

 न्यूड

इफ्फीमध्ये वादाचा मुद्दा ठरलेला न्यूड सिनेमाही यावर्षी रिलीज होईल. मुहूर्तालाच साडेसाती लागलेल्या या सिनेमाला आणखी किती विरोधाचा सामना करावा लागतोय ते येत्या काळात कळेल.

छत्रपती शिवाजी

या दोन सिनेमांबरोबरच रवी त्याच्या मोस्ट अवेटेड छत्रपती शिवाजी सिनेमाच्या शूटिंगलाही सुरुवात करेल. रितेश देशमुख यात महाराजांची भूमिका साकारतोय.

अंकुश चौधरी आणि साऊथ सिनेमाचा रिमेक हे कॉम्बिनेशन नव्या वर्षातही कायम राहाणाराय. 'रिव्हेंज ऑफ महेश' या मल्याळम सिनेमाचा मराठी रिमेक या वर्षात पाहायला मिळेल. अंकुश चौधरीने यात मुख्य भूमिका साकारलीय.

मृण्मयी देशपांडे, प्रियदर्शन जाधव, आलोक राजवाडे ही आजवर अभिनय करताना दिसलेली मंडळी आता दिग्दर्शक म्हणून आपल्या समोर येतील. विजू मानेचा शिकारी आणि अभिजीत पानसेच्या उळागड्डी सिनेमाचीही तेवढीच उत्सुकता आहे.

असे अनेक सिनेमे 2018 च्या पोतडीत लपलेले आहेत.  2017 मध्ये मराठी सिनेमांचं शतक पूर्ण झालं होतं. या वर्षातही त्याची पुनरावृत्ती होऊ शकते. अपेक्षा एवढीच की केवळ सिनेमांची संख्या वाढू नये तर यशस्वी सिनेमांची संख्या वाढू दे.

संबंधित बातम्या

येत्या दोन वर्षात तीन ऐतिहासिक शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर