मुंबई : बॉलिवूडमध्ये नव्वदच्या दशकातील सर्वात लोकप्रिय जोडींपैकी एक अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर दिसणार आहे. धमाल सिनेमाचा तिसरा सिक्वेल ‘टोटल धमाल’मधून ही जोडी एकत्र येणार आहे.


अभिनेता अजय देवगण या सिनेमाची निर्मिती इंद्र कुमार यांच्यासोबत करणार आहे. या सिनेमाच्या पूर्वीच्या दोन भागांमध्ये संजय दत्तची प्रमुख भूमिका होती. मात्र यावेळी संजय दत्त या सिनेमात नसेल. 'टोटल धमाल' डिसेंबर 2018 मध्ये रिलीज होणार असल्याची माहिती आहे.

आपण इंद्र कुमारसोबत अनेक दिवसांनी काम करणार असल्याचं माधुरीने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत सांगितलं होतं. अनेक वर्षांपासून कॉमेडी सिनेमात काम केलेलं नाही, त्यामुळे हा सिनेमा आव्हानात्मक असेल, असंही माधुरीने म्हटलं होतं.

नव्वदच्या दशकात अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित ही सर्वाधिक लोकप्रिय जोडी होती. 2000 साली 'पुकार' सिनेमात ही जोडी दिसली होती. त्यानंतर तब्बल 17 वर्षांनी अनिल कपूर आणि माधुरी पुन्हा एकदा एकत्र येत आहेत.

दरम्यान, 'टोटल धमाल'मध्ये माधुरी आणि अनिल कपूर यांच्याशिवाय अजय देवगण, रितेश देशमुख, अरशद वारसी आणि जावेद जाफरी यांचीही भूमिका असेल. या सिनेमाचे अगोदरचे दोन्हीही भाग यशस्वी ठरले होते.