Kaali Poster Controversy : ‘काली’ (Kaali) या माहितीपटाच्या वादग्रस्त पोस्टरमुळे सध्या सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला आहे. या पोस्टरमध्ये दाखवलेल्या दृश्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. सदर निर्माती विरोधात कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी नेटकऱ्यांकडून सातत्याने केली जात होती. आता या माहितीपटाच्या निर्मात्या लीना मणिमेकलाई (Leena Manimekalai) यांच्यासह, सहनिर्माते आणि चित्रपट संपादक यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत एफआयआर नोंदवला आहे. लखनऊच्या हजरतगंज पोलिस ठाण्यात सोमवारी (4 जुलै) हा एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
चित्रपट निर्मात्या लीना मणिमेकलाई यांच्यावर गुन्हेगारी कट रचणे, हेतुपुरस्सर धार्मिक भावना दुखावणे, समाजातील शांतता भंग करणे, आणि हिंदू देवीचे चुकीच्या पद्धतीने चित्रण करणे, असे आरोप लावण्यात आले आहेत.
नेमकं प्रकरण काय?
निर्मात्या लीना मणिमेकलाई यांनी एका माहितीपटाची निर्मिती केली आहे. त्यांच्या या माहितीपटाचे नाव ‘काली’ आहे. मात्र, या माहितीपटाच्या पोस्टरमध्ये माँ कालीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सिगारेट ओढताना दाखवण्यात आली असून, माँ कालीच्या वेशभूषेत असलेली ही अभिनेत्री एका हातात त्रिशूळ आणि एका हातात LGBTQ समुदायाचा ध्वज घेऊन दिसत आहे. हे पोस्टर हिंदू समाजाच्या भावना आणि श्रद्धा दुखावत असल्याचे म्हणत सोशल मीडियावरील यूजर्स संतापले आहेत.
डॉक्युमेंट्रीच्या निर्मात्या लीना मणिमेकलाई यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या वादग्रस्त पोस्टरबद्दल दिल्लीतील एका वकिलाने एफआयआर नोंदवला आहे. रिपोर्ट्सनुसार, त्याने या माहितीपटातील आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ क्लिप्सवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. काली मातेच्या वेशात एक महिला सिगारेट ओढताना दाखवणारे हे पोस्टर हिंदू समाजाच्या भावना आणि श्रद्धा दुखावत आहे, असे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
हेही वाचा :