Udit Narayan Love Story : गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक उदित नारायण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. महिला चाहत्यांना किस करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. उदित नारायण यांनी फक्त चाहत्यांना नाही, तर याआधी श्रेया घोषाल आणि अलका याज्ञिक यांच्यासारख्या दिग्गज गायिकांनाही स्टेजवर किस केलं होतं, त्यामुळे ते वादात सापडले होते. इतकंच नव्हे, तर पहिली पत्नी असताना त्यांनी दुसरं लग्न केलं होतं.


उदित नारायण यांच्या दोन पत्नी


उदित नारायण यांचं वैयक्तिक आयुष्य कायमच चर्चेत राहिलं आहे. एकीकडे उदित नारायण यांचा फॅन्सला किस करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत असताना दुसरीकडे त्यांचं पहिलं लग्नही चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे. त्यांची पहिली पत्नी सध्या कुठे आणि कोणत्या परिस्थितीत आहे, हा प्रश्न सध्या सगळे विचारत आहे. कोर्टाने उदित यांना दोन्ही पत्नींनासोबत ठेवण्याचा आदेश दिला होता, मात्र तरीही त्यांनी पहिल्या पत्नीला माघारी धाडून दुसरीसोबत संसार थाटला.


रंजनाला धोका देत दीपासोबत थाटला संसार


नेहमी बॉलिवूडच्या हिट गाण्यामुळे चर्चेत असणारे उदित नारायण आता त्यांच्या 'रंगीन मिजाज'मुळे चर्चेत आले आहेत. उदित नारायण यांची मोठी फॅन फॉलोईंग आहे. त्यांच्या जन्म बिहारच्या सुपौल जिल्ह्यातील बायस गोठ या गावात झाला. मुंबईत येण्याआधी त्यांनी 1984 मध्ये रंजनासोबत लग्न केलं. त्यानंतर नाव कमावण्यासाठी मुंबईत आलेल्या उदित नारायण यांना काम मिळू लागलं, तेव्हा त्यांची ओळख दीपा यांच्यासोबत झाली. एकमेकांच्या प्रेमात पडल्यावर 1985 मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली. महत्त्वाचं म्हणजे रंजनाला घटस्फोट न देता गुपचूप त्यांनी दीपासोबत लग्न उरकलं. दीपा यांच्याशी लग्न केल्यावर दोन वर्षानंतर त्यांना मुलगा झाला, ज्याचं नाव आदित्य नारायण.


कुठे आहे उदित नारायण यांची पहिली पत्नी?


उदित यांचं दुसरं लग्न आणि मुलाची माहिती मिळताच रंजनाच्या पायाखालची जमीन सरकली. त्यानंतर उदित नारायण शोसाठी पाटणामध्ये आल्यावर रंजना मीडियाला घेऊन शोमध्ये पोहोचली आणि त्यांची पहिली पत्नी असल्याचा दावा केला. पण, उदित नारायण यांनी रंजनाला ओळखण्यास नकार दिला. हे प्रकरण कोर्टात पोहोचलं. त्यानंतर उदित यांनी रंजनाचा पहिली पत्नी म्हणून स्वीकार केला. त्यानंतर कोर्टाने उदित यांना पहिल्या पत्नीला पोटगी देण्याचा आदेश दिला.


पहिल्या बायकोला गावी पाठवत दुसरीसोबत थाटला संसार


दरम्यान, रंजनाला घटस्फोटन नको होता, तर उदित यांची साथ हवी होती. रंजनाने दीपासोबत सामंजस्याने राहण्याचा निर्णय घेतला. कोर्टाने उदित यांना दोन्ही बायकांना सोबत ठेवण्याचा आदेश दिला. पण, कोर्टाच्या आदेशानंतरही काळी काळाने उदित यांनी रंजनाला गावी पाठवलं आणि तिला घरखर्चाला पैसे पाठवण्यास सुरुवात केली. पण, रंजनाला आजही पत्नीचा दर्जा मिळालेला नाही. आजही रंजना मुंबईला गेल्यावर तिथून तिची हकालपट्टी केली जाते.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Raja Shivaji : 'राजा शिवाजी' भूमिकेतील रितेश देशमुखचा फर्स्ट लूक समोर, 'हे' 3 दिग्गज बॉलिवूड अभिनेते साकारणार मुघलांची भूमिका