पणजी (गोवा) : भारतीय सैन्याला स्वत:चा स्वाभिमान आहे. त्यांना खंडणीतून उकळलेला पैसा नको. म्हणून भारतीय सैन्याने पैसे घेणे नाकारलं, असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केला. गोव्यातील विधानसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसाठी उद्धव ठाकरे गोवा दौऱ्यावर आहेत. त्यावेळी ते बोलत होते.
'ऐ दिल है मुश्किल' सिनेमाचा तिढा काल मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर सुटला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, दिग्दर्शक करण जोहर, निर्माते मुकेश भट यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' बंगल्यावर बैठक झाली. त्यानंतर राज ठाकरेंनी काही अटी ठेवून 'ऐ दिल है मुश्किल'च्या प्रदर्शनाचा विरोध मागे घेतला. त्यातली एक अट अशी आहे की, पाकिस्तानी कलाकारांना सिनेमात घेणाऱ्या निर्मात्यांनी आर्मी वेल्फेअर फंडाला 5-5 कोटी रुपये द्यावे. राज ठाकरेंच्या या अटीवर सोशल मीडियासह अनेक स्तरावरुन टीकाही झाली. त्यानंतर पणजीत आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर घणाघात केला.
उद्धव ठाकरे म्हणाले, "सैन्याला स्वत:चा अभिमान आहे. त्यामुळे त्यांना खंडणीतून उकळलेले पैसे नको आहे. मदत करायची आहे, तर दिलसे करो. जो भी करना है दिलसे करो."
उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीस, राज ठाकरे, करण जोहर यांना टोला
'ऐ दिल है मुश्किल' सिनेमाबाबत राज ठाकरे, मुख्यमंत्री आणि करण जोहर यांच्या 'वर्षा'वरील बैठकीबाबत उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, "वर्षा बंगल्यावर झालेल्या चर्चेची संपूर्ण माहिती मिळाली नाही. पण मला एक माहिती मिळाली की, ते तिघं मिळून 'ये तो होना ही था' असा एक चित्रपट काढणार आहेत."
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या विधानावर मनसेच्या नेत्यांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, येत्या काळात 'ऐ दिल है मुश्किल'वरुन ठाकरे बंधूंमध्ये वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.