रणबीर कपूरसोबतच्या 'त्या' सीनबाबत अखेर ऐश्वर्याने मौन सोडलं!
एबीपी माझा वेब टीम | 23 Oct 2016 11:08 AM (IST)
मुंबई : करण जोहर दिग्दर्शित 'ऐ दिल है मुश्किल' सिनेमा सध्या राजकीय वादात अडकला असला, तरी सिनेरसिकांमध्ये या सिनेमातील रणबीर-ऐश्वर्याच्या केमिस्ट्रीची चर्चा रंगताना दिसतेय. 'जज्बा' आणि 'सरबजीत' सिनेमांमधील भूमिकेहून थोडी हटके भूमिका ऐश्वर्याने या सिनेमात साकारलीय. रणबीर आणि ऐश्वर्यामध्ये अत्यंत रोमँटिक, हॉट सीन्स या सिनेमात आहेत. बॉलिवूडमध्ये साधारणत: कमी वयाच्या नायिकेसोबत पडद्यावर रोमान्स करताना नायक दिसतो. मात्र, 'ऐ दिल है मुश्किल'बाबत थोडं वेगळं आहे. इथे रणबीर वयाने कमी आणि ऐश्वर्या वयाने मोठी आहे. त्यामुळे बच्चन कुटुंबीय ऐश्वर्याच्या भूमिकेबाबत नाराज होते, अशी चर्चा होती. मात्र, तशी कोणतीही नाराजी कुटुंबीयांमध्य नसल्याचे ऐश्वर्याने स्पष्ट केले आहे. त्याचसोबत, रणबीरसोबतच्या रोमँटिक सीन्सबाबतही ऐश्वर्याने मौन सोडलं आहे. ऐश्वर्या म्हणाली, "या सिनेमात रणबीर आणि माझ्यामधील रोमान्स विकृत पद्धतीने दाखवला नाहीय. अत्यंत चांगल्या पद्धतीने रोमान्स सादर करण्यात आला आहे." "रोमँटिक सीन्स करणं, हे तुमच्या दिग्दर्शकाशी असलेल्या कम्फर्ट लेव्हलवर अवलंबून असतं. मुळात आम्हा कलाकारांना सिनेमाचा प्रवास आधीच माहित असतो. त्यामुळे भूमिका साकारताना कोणतीही काळजी नसते.", असेही ऐश्वर्या म्हणाली. 'ऐ दिल है मुश्किल'मध्ये ऐश्वर्या रॉय, रणबीर कपूर, अनुष्का शर्मा मुख्य भूमिकेत आहेत. 28 ऑक्टोबरला हा सिनेमा रिलीज होणार आहे.