मुंबई : दिवंगत चित्रपट निर्माते यश चोप्रा यांचा पुत्र, बॉलिवूड अभिनेता उदय चोप्राने 'हॉलिवूड'मधील प्रॉपर्टी विक्रीला काढली आहे. विशेष म्हणजे दक्षिण मुंबईतील पॉश फ्लॅट्सपेक्षा लॉस अँजेलिसमधील हा व्हिला स्वस्त आहे.
'एलए टाइम्स'च्या वृत्तानुसार दोन वर्षांपूर्वी उदयने 3.025 मिलियन डॉलर्सना (अंदाजे 20 कोटी रुपये) हा व्हिला विकत घेतला होता. आता 3.799 मिलियन डॉलर (अंदाजे 25 कोटी) रुपयांना हा व्हिला विकण्याची त्याची तयारी आहे.
दक्षिण मुंबईत वरळीमध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली फ्लॅट विकत घेणार होता. या फ्लॅटची किंमत 34 कोटींच्या घरात होती. 35 व्या मजल्यावर असलेला हा सात हजार चौरस फुटांचा फ्लॅट हॉलिवूडमधील घरापेक्षा महाग आहे.
अमेरिकेत लॉस अँजेलिसमधील हॉलिवूड हिल्स भागात हा पॉश बंगला आहे. जॉनी डेप, केटी पेरी, मायला कुनिस यासारख्या हॉलिवूड स्टार्सच्या घरांशेजारी हा व्हिला आहे.
या दुमजली व्हिलामध्ये सॉल्टवॉटर पूल, स्पा, वेलींनी आच्छादित भिंती, फायरप्लेस, लाऊंज, लँडस्केप कोर्टयार्ड आणि चार बेडरुम्स आहेत. उदय चोप्रा हिंदी फिल्म युनिटच्या हॉलिवूडमधील चित्रिकरणाची धुरा सांभाळतो, तर यशराज फिल्म्स (वायआरएफ) च्या मुंबईतील ऑफिसची जबाबदारी आदित्य चोप्रांकडे आहे.