मुंबई : बॉलिवूडचा किंग शाहरुख खानची सख्खी चुलत बहिण नूरजहाँ ही पाकिस्तानच्या पेशावरमधून निवडणूक लढवणार आहे. ती पाकिस्तानात राहते आणि शाहरुखच्या अतिशय जवळची आहे. खैबर पख्तुनवा विधानसभा मतदारसंघातून नूरजहाँ आवामी नॅशनल पार्टीकडून निवडणूक लढवणार आहेत. खान अब्दुल गफार खान यांचे पुत्र अब्दुल वाणी खान यांनी ह्या पक्षाची स्थापना केली आहे.


नूरजहाँ म्हणाल्या की, "महिला सबलीकरणासाठी मला काम करायचं आहे. माझ्या मतदारसंघात मी या विषयावर लक्ष केंद्रीत करणार आहे. मला आशा आहे की, इथले नागरिक माझ्याही पाठीशी राहतील."

नूरजहाँ कोण आहे?
नूरजहाँ ही शाहरुख खानची सख्खी चुलत बहिण आहे. शाहरुख खानचे काका गुलाम मोहम्मद उर्फ गामा यांची ती मुलगी आहे. 1997 मध्ये मुंबईत आली असताना नूरजहाँ आणि शाहरुखची भेट झाली होती. तर शाहरुखने 1978 आणि 1980 या सालात पेशावरमधील वडिलोपार्जित घराला भेट दिल्याचं नूरजहाँ यांनी सांगितलं.



काही नातेवाईक पाकिस्तानात
शाहरुख खानचे वडील स्वातंत्र्यसैनिक होते आणि खान अब्दुल गफार खान यांचे कट्टर समर्थक होते. फाळणीपूर्वी त्याचं कुटुंब पेशावरमध्ये राहायचं. फाळणीनंतर ते भारतात आले. पंरतु त्याच्या कुटुंबातील काही सदस्य अजूनही तिथेच राहतात.

दिलीप कुमार, राज कपूर यांचं पाकिस्तान कनेक्शन
नूरजहाँ पेशावरमधील शाह वाली कताल परिसरात राहतात. इथेच शाहरुखचे वडील मीर ताज मोहम्मद आधी राहायचे. बॉलिवूडचे ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार यांचा जन्मही याच परिसरात झाला होता. तर या ठिकाणापासून काही अंतरावर राज कपूर यांचं वडिलोपार्जित घर आहे.