व्हायरल सत्य : अजय देवगनचं हेलिकॉप्टर महाबळेश्वरमध्ये क्रॅश?
एबीपी माझा वेब टीम | 15 May 2018 04:23 PM (IST)
महाबळेश्वरमध्ये अभिनेता अजय देवगनच्या हेलिकॉप्टरला अपघात झाल्याचे मेसेज व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाले असून त्यामध्ये अजिबात तथ्य नाही
मुंबई : बॉलिवूड सेलिब्रेटीचा अपघात किंवा निधन झाल्याच्या अफवा अनेक वेळा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कित्येक यूझर्स अशा मेसेजची सत्यता न पडताळताच तो फॉरवर्ड करतात. बॉलिवूडचा सिंघम अभिनेता अजय देवगनला यावेळी अशा अफवांचा फटका बसला आहे. महाबळेश्वरमधील डोंगराळ भागात अजय देवगनच्या हेलिकॉप्टरला अपघात झाल्याचे फेक व्हॉट्सअॅप मेसेज व्हायरल झाले आहेत. या अपघातात पायलटचा जागीच मृत्यू झाल्याचंही लिहिण्यात आलेलं आहे, मात्र या मेसेजमध्ये जरासंही तथ्य नाही. महाबळेश्वर पोलिसांनी असा कोणताही हेलिकॉप्टर अपघात झाला नसल्याचं 'डीएनए' वृत्तपत्राला सांगितलं आहे. या अफवेचं मूळ काय आहे हे शोधून आरोपीपर्यंत पोहचण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. 13 मेपासून हे फेक मेसेज व्हायरल झाले आहेत. अभिनेता अजय देवगन सुखरुप असून त्याला कोणताही अपघात झाला नसल्याचं सांगितलं जात आहे. अजयच्या चाहत्यांनी काळजी करण्याचं कारण नाही, असं आवाहनही केलं जात आहे.