मुंबई : बॉलिवूड अभिनेता तुषार कपूर पिता झाला आहे. कुठल्याही सिनेमात तो वडिलांची व्यक्तिरेखा साकारत नसून खऱ्याखुऱ्या आयुष्यात तुषार बाप झाला आहे. लग्नापूर्वीच आयव्हीएफ तंत्रज्ञान आणि सरोगसीच्या माध्यमातून तुषारने सिंगल पॅरेंट होण्याचा निर्णय घेतला.

 
तुषार कपूरने सरोगसीद्वारे एका मुलाला जन्म दिला असून त्याचं लक्ष्य असं नामकरण करण्यात आलं आहे. बाळाची प्रकृती व्यवस्थित असल्याची माहिती आहे.

 
'पिता होण्याचा अनुभव अत्यंत रोमांचकारी आहे. लक्ष्यचा पिता होणं ही माझ्यासाठी अत्यानंदाची गोष्ट आहे. हा आनंद व्यक्त करायला माझ्याकडे शब्द नाहीत. देवाच्या दयेने आणि जसलोक रुग्णालयातील उत्कृष्ट वैद्यकीय पथकामुळे माझ्यासारख्या एकल पालकांसाठी हे वरदान ठरलंय' अशा भावना तुषार कपूरने व्यक्त केल्या आहेत.

 
तुषारचे पिता, ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र आणि आई शोभा कपूर यांनीही आजी-आजोबा झाल्याचा आनंद व्यक्त केला आहे. 'आम्ही तुषारच्या निर्णयाचं स्वागत करतो. आमच्यासाठी हा सुखद अनुभव आहे. तुषार हा उत्तम मुलगा असून त्याने आतापर्यंत सर्व जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडल्या आहेत. त्यामुळे वडिलांची भूमिकाही तो व्यवस्थित निभावेल यात शंका नाही.' असा विश्वास जितेंद्र-शोभा यांनी व्यक्त केला आहे.

 
आतापर्यंत सुष्मिता सेन, रविना टंडन, नीना गुप्ता यासारख्या अभिनेत्री सिंगल मदर झाल्याचं उदाहरण होतं. मात्र तुषारच्या निमित्ताने बॉलिवूडमध्ये सिंगल फादर पाहायला मिळत आहे.