अॅक्शन सीनदरम्यान गोळी लागून सैफ अली खान जखमी
एबीपी माझा वेब टीम | 27 Jun 2016 05:46 AM (IST)
मुंबई : शूटिंगच्या सेटवर गोळी लागल्याने अभिनेता सैफ अली खान जखमी झाला आहे. या घटनेत सैफच्या अंगठ्याला गोळी लागली. त्याच्यावर वेळीच उपचार झाल्याने सैफच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. सैफच्या होम प्रॉडक्शन असलेल्या एका सिनेमाचं पवईत शूटिंग सुरु होतं. मात्र शनिवारी शूटिंगदरम्यान सैफच्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली. यानंतर त्याला तातडीने कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सैफची बहिण सोहा अली खाननेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 'अमर उजाला'च्या वृत्तानुसार, "सेटवर अॅक्शन सीनची शूटिंग सुरु होती. मात्र यावेळी एअरगनमधून मिसफायर झाल्याने गोळी सैफच्या अंगठ्याला लागली. यानंतर जखमी सैफला तातडीने कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला." या अपघातानंतर सिनेमाचं शूटिंग थांबवण्यात आलं, पण सैफची दुखापत मोठी नसल्याने सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. सैफची दुखापत मोठी नसली तर या घटनेनंतर सेटवर गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं, असं सिनेमाशी संबंधित सुत्राने सांगितलं.