Tujhya Aaila: 'शाळा' या पुरस्कार विजेत्या चित्रपटापासून 'फुंतरू'पर्यंत नेहमीच विविधांगी विषय हाताळत नावीन्यपूर्ण प्रयोग करणारा दिग्दर्शक सुजय डहाके आजवर कधीही समोर न आलेल्या विषयावर सिनेमा घेऊन येत आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं एका वेगळ्या विषयावर चर्चा सुरू होणार आहे. लहान मुलांच्या भावविश्वावर आधारलेल्या या चित्रपटात कुतूहल जागवणाऱ्या काही महत्त्वपूर्ण मुद्द्यांचा सर्वांगाने विचार करण्यात आला आहे. 'तुझ्या आयला' असं नाव असणाऱ्या या चित्रपटाचं नुकतंच पोस्टर लाँच करण्यात आलं आहे.


'तुझ्या आयला' चित्रपटाच्या दिग्दर्शनासोबतच निर्मितीही सुजय डहाकेनं केली आहे. अश्विनी परांजपे या चित्रपटाच्या निर्मात्या तसंच कार्यकारी निर्मात्याही आहेत. मेघना प्रामाणिक आणि देबाशिष प्रामाणिक यांनी या चित्रपटाची सहनिर्मिती केली आहे. या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं आहे. उत्सुकता जागवणाऱ्या या पोस्टरवर नेटकरी भरभरून व्यक्त होत आहेत. 'तुझ्या आयला' या टायटलसोबत लिहिण्यात आलेली 'शिवी नाय खेळाचं नाव हाय ते' ही टॅगलाईन चित्रपटाचा फोकस स्पष्ट करणारी आहे. 


'तुझ्या आयला' या चित्रपटाच्या पोस्टरवरील रेखाचित्रात एक झाड आणि त्याखाली दोन मुलं दिसतात. झाडावर शेळी, डांबर, हल्क, डॉक्टर, तोफ, चिवडा, गोट्या, लिंबू, नारळ, बैल, गाढव असे बरेच शब्दही रेखाटण्यात आले आहेत. यावरून हा चित्रपट टॅगलाईननुसार काहीतरी अनोख्या खेळाची माहिती देणारा असल्याचं स्पष्ट होतं. 50 व्या इंडियन पॅनोरमामध्ये कौतुक झालेल्या या चित्रपटानं 18 व्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये स्पेशल ज्युरी अॅवॉर्ड, ऑडीयन्स चॅाईस अॅवॅार्ड आणि बेस्ट सिनेमॅटोग्राफी या तीन पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना एका अनोख्या विश्वाची सफर घडवणारा असून, त्यांनी कधीही न पाहिलेलं अफलातून चित्र दाखवणारा असल्याचं दिग्दर्शक सुजय डहाकेचं म्हणणं आहे.






अत्यंत कठीण असलेल्या विषयावर पटकथा लेखन करण्याचं काम नियाझ मुजावर यांनी केलं आहे. राजश्री देशपांडे, रोहिणी हट्टंगडी, संभाजी भगत, अभिजीत थिटे, सोहम बाबर, अभिषेक झेंडे आदी कलाकारांनी या चित्रपटात अभिनय केला आहे. विजय मिश्रा यांनी सिनेमॅटाग्राफी केली असून, आशय गटाडे यांनी संकलन केलं आहे. साकेत कानेटकर यांनी पार्श्वसंगीत केलं असून, पिनाक आगटे यांनी लोकेशन साऊंडची जबाबदारी सांभाळली आहे. नामदेव वाघमारे यांनी कॅास्च्युम डिझाईन केलं असून, सुजयने स्वत:च प्रोडक्शन डिझाईन केलं आहे. आयबा डिझाईनने ब्रँड स्ट्रॅटेजी ठरवली असून, कास्टिंग अश्विनी परांजपे यांनी केलं आहे.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: