मुंबई : हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडणाऱ्या अमरीश पुरी यांचा आज जन्मदिवस. अमरीश पुरी यांचा जन्म आजच्या दिवशी म्हणजे 22 जून 1932 रोजी पंजाबमधील नवांशहर येथे झाला. आज त्यांची 87वी जयंती आहे. या निमित्ताने गुगलने डूडल बनवून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.



धिप्पाड शरीरयष्टी, दमदार आवाज, भीतीदायक गेटअप आणि जबरदस्त व्यक्तिमत्त्व याच्या जोरावर अमरीश पुरी यांनी अनेक वर्ष सिनेरसिकांच्या हृदयावर राज्य केलं. 'मिस्टर इंडिया' मधील 'मोगॅम्बो' असो, वा 'घातक'मधील 'शंभू नाथ' किंवा 'डीडीएलजी'मधील 'बाबूजी'... अमरीश पुरींनी प्रत्येक भूमिका अजरामर केली.

अमरीश पुरी यांनी 30 पेक्षा जास्त वर्ष चित्रपटसृष्टीत काम केलं. त्यांनी खलनायकाची भूमिका सर्वात जास्त वेळा साकारली. परंतु नकारात्मक भूमिका ते एवढ्या उत्तम पद्धतीने साकारल्या की, हिंदी चित्रपटांमध्ये 'क्रूर माणूस' म्हणून पर्याय बनले. त्यांना वयाच्या 40 वर्षी ओळख मिळल्याचं, त्यांचे पुत्र राजीव पुरी सांगतात.

अमरीश पुरी यांचा 1967 पासून सुरु झालेला सिनेप्रवास शेवटच्या श्वासापर्यंत म्हणजे 2005 पर्यंत सुरु राहिला. 12 जानेवारी 2005 रोजी मुंबईत त्यांचं निधन झालं.

अमरीश पुरी यांची कारकीर्द

- खूप कमी लोकांना माहिती आहे की, अमरीश पुरी यांच्या करिअरची सुरुवात मराठी सिनेमापासून झाली होती. 1967 सालच्या 'शांतता! कोर्ट चालू आहे' या नाटकावर आधारित सिनेमात अमरीश पुरींनी रेल्वे डब्यात गाणं गाणाऱ्या एका अंध व्यक्तीची भूमिका साकारली होती.

- समांतर सिनेमाच्या चळवळीतही अमरीश पुरी सक्रीय होते. श्याम बेनेगल, स्मिता पाटील यांच्याबरोबरही त्यांनी अनेक सिनेमे केले.

- वयाच्या 39 व्या वर्षी अमरीश पुरींनी 'रेशमा और शेरा' या सिनेमातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. सुनील दत्त, अमिताभ बच्चन आणि वहिदा रेहमान यांच्या मुख्य भूमिका असलेला 'रेशमा और शेरा' सिनेमात त्यांनी रहमत खान नावाच्या व्यक्तीचे पात्र साकारले होते.

- अमरीश पुरींनी एकूण 400 हून अधिक सिनेमांमध्ये अभिनय केला आहे.


- 1984 साली स्टिव्हन स्पीलबर्ग यांनी 'इंडियाना जोन्स अँड द टेम्पल ऑफ डूम' या सिनेमात अमरीश पुरींना 'मोला राम' नावाची भूमिका दिली होती. स्पीलबर्ग यांच्या सर्वात आवडत्या अभिनेत्यांच्या यादीत अमरीश पुरी यांचंही नाव होतं.

- स्पीलबर्ग यांच्या सिनेमामुळे परदेशात अमरीश पुरींना 'मोला राम' या नावाने ओळखलं जातं.

- अमरीश पुरींना टोप्यांची प्रचंड आवड होती. त्यांच्या घरी आजही वेगवेगळ्या देशांमधील जवळपास 200 टोप्यांचं कलेक्शन आहे.

- अमरीश पुरी यांचे दोन्ही मोठे भाऊ म्हणजेच मदन आणि चमन पुरी हे अमरीश पुरी यांच्या आधीपासूनच अभिनय क्षेत्रात होते. मात्र, अमरीश पुरी पहिल्या स्क्रीन टेस्टमध्ये अपयशी झाले होते. त्यानंतर त्यांना एम्प्लॉईज स्टेट इन्शूरन्स कॉर्पोरेशनमध्ये काम केलं.

- त्यांच्या मृत्यूनंतर म्हणजे 2006 मध्ये रिलीज जालेला 'कच्ची सडक' हा सिनेमा अमरीश पुरींचा शेवटचा सिनेमा.

वैयक्तिक आयुष्य
अमरीश पुरी यांनी उर्मिला दिवेकर यांच्यासोबत 5 जानेवारी 1957 रोजी मुंबईतील वडाळ्यातील श्रीकृष्ण  मंदिरात लगीनगाठ बांधली. अमरीश आणि उर्मिला यांना दोन मुलं आहेत. मुलगा राजीव पुरी हा व्यावसायिक आहे, तर मुलगी नम्रता डॉक्टर आहे. अमरीश पुरी यांनी 2005 मध्ये अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 72 व्या वर्षी मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने त्यांचं निधन झालं.

अमरीश पुरींचा मुलाला चित्रपटात न येण्याचा सल्ला
राजीव पुरी यांच्या मते, अमरीश पुरी यांनी कधीही त्यांची इच्छा आमच्यावर लादली नाही. त्यावेळी बॉलिवूडमधील परिस्थिती चांगली नव्हती. ते मला म्हणाले की, इथे येऊ नको, जे योग्य वाटतं ते कर. तेव्हा मी मर्चंट नेव्हीमध्ये गेलो, असं राजीव पुरी यांनी सांगितलं.

नातू चित्रपटात


अमरीश पुरी यांचे पुत्र राजीव पुरी तर चित्रपटसृष्टीत आले नाहीत, पण त्यांचा नातू चित्रपटांशी संबंधित आहे. राजीव यांचा मुलगा वर्धन पुरी यशराज फिल्म्समध्ये असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलं आहे. त्याने 'इश्कज़ादे', 'शुद्ध देशी रोमान्स' आणि 'दावते इश्क' या सिनेमांसाठी कॅमेऱ्याच्या मागे राहून काम केलं.