करमाळा (सोलापूर) : 'सैराट' चित्रपटामुळे आर्ची-परशासह लहानमोठे सर्वच कलाकार प्रकाशझोतात आले. इतकंच काय सैराटचं शूटिंग झालेली लोकेशन्सही गर्दी खेचू लागली. सिनेमात ज्या झाडाच्या फांदीवर आर्ची बसली होती, तिलाही चांगलंच प्रसिद्धीचं वलय मिळालं. मात्र आता तीच फांदी तुटल्यामुळे सोशल मीडियावर सैराटप्रेमी हळहळत आहेत.


अजय-अतुल यांचं संगीत असलेल्या 'सैराट झालं जी...' या गाण्यामध्ये एका वाळलेल्या झाडाच्या फांदीवर आर्ची बसलेली दाखवली आहे. करमाळ्यातील एका झाडावर या गाण्यातला काही भाग चित्रित झाला होता. चित्रपटानंतर हे झाड सेल्फी पॉईंट झालं. या झाडाची 'सैराट झाड' हीच ओळख पुढे आली होती.

चित्रपटाच्या यशानंतर राज्यभरातील चित्रपटप्रेमींनी या झाडाला भेट दिली. या झाडावरील ज्या फांदीवर आर्ची बसलेली होती, नेमकी तीच फांदी तुटली आहे. पर्यटकांनी सतत झाडावर चढल्या-उतरल्यामुळे ही फांदी तुटल्याचं बोललं जात आहे.

झाडाची फांदी तुटल्याची बातमी 'इंटरनेट'च्या वेगानं सोशल मीडियावर पसरली. त्यामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. या झाडाचं खोडही दुभंगलं असून हे झाड आता नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचं म्हटलं जात आहे.