नवी दिल्लीः टीम इंडियाचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा बायोपिक 'धोनीः दी अनटोल्ड स्टोरी'चा मच अवेटेड ट्रेलर अखेर लाँच झाला आहे. धोनीने मुंबईत या सिनेमाचं ट्रेलर लाँच केलं. यावेळी अभिनेता सुशांत सिंह राजपूत देखील उपस्थित होता. धोनीच्या आयुष्यातील अनेक किस्से या ट्रेलरमधून उलगडले आहेत.

 

धोनीने निवडकर्त्यांना 'ते' तीन खेळाडू सध्या संघासाठी अनफिट आहेत, असा सल्ला देत त्यांना बाहेर करण्याचं सुचवलं आहे. ट्रेलरमधील हे किस्से पाहता सिनेमातून अनेक सस्पेंस समोर येतील, असं दिसत आहे.

 

कोण आहेत ते तीन खेळाडू?

संघातून तीन खेळाडूंना बाहेर करण्याचा सल्ला दिल्यानंतर निवडकर्त्यांनी धोनीच्या या निर्णयाला विरोध केला. मात्र धोनीने निवडकर्त्यांना एकनिष्ठतेचा मंत्र दिला. आपण देशाचे सेवक आहोत आणि हे आपलं कर्तव्य आहे, अशा शब्दात धोनीने निवडकर्त्यांना सुनावलं आहे.

 

दरम्यान ते तीन खेळाडू कोण होते, अशी चर्चा सध्या सुरु झाली आहे. वेस्ट इंडिजमध्ये 2007 च्या विश्वचषकात टीम इंडिया पहिल्याच फेरीत बाहेर पडल्यानंतर टीमवर नजर टाकली असता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सौरव गांगुली या तीन खेळाडूंचं स्थान धोक्यात आलं होतं.

 



 

पाकिस्तानविरुद्ध 2007 मध्ये ग्वालियर वन डे सीरिजनंतर सौरव गांगुलीला टीम इंडियातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. तर ऑक्टोबर 2007 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्यानंतर राहुल द्रविडला दोन वर्ष संघात स्थान देण्यात आलं नव्हतं. द्रविडने 2011 साली इंग्लंडच्या वन डे आणि टी-20 दौऱ्यासाठी निवड झाल्यानंतर लगेचच निवृत्तीची घोषणा केली होती.

 

मात्र सचिनने त्यानंतरही बराच काळ टीममध्ये घालवला. त्यामुळे तिसरा खेळाडू कोण आहे, याचा खुलासा ट्रेलरमध्ये करण्यात आलेला नाही. धोनीला अनफिट वाटणारे टीममधील ते तीन खेळाडू कोण, याचा खुलासा 30 सप्टेंबरला सिनेमा रिलीज झाल्यानंतरच होणार आहे.

 

पाहा ट्रेलरः