TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या - 


हिंदू देवतेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीच्या हातात सिगारेट अन् LGBTQचा झेंडा, ‘काली’ डॉक्युमेंट्रीचं पोस्टर पाहून संतापले नेटकरी!


 बॉलिवूड चित्रपटांमधून सातत्याने हिंदू देवदेवतांचा अपमान केला जातो, यावरून अनेकदा वादही निर्माण झाले आहेत. आताही अशीच एक घटना घडली आहे. मात्र, यावेळी नेटकरी प्रचंड संतापले असून, त्यांनी केंद्रीय गृहमंत्रालय, अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग करत कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. इतकेच नाही तर, सदर व्यक्तीला अटक आकारण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली आहे. ‘काली’ नावाच्या डॉक्युमेंट्रीच्या पोस्टरवरून हा वाद सुरु झाला आहे. चित्रपट निर्मात्या लीना मणिमेकलाई यांच्या 'काली' या माहितीपटाच्या पोस्टरमुळे देशाभरात संतापाची लाट उसळली आहे.


‘अनन्या’च्या भावना व्यक्त झाल्या 'न कळत'; रोमँटिक गाणे प्रेक्षकांच्या भेटीला


‘शक्य आहे, तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे!’ असे म्हणणाऱ्या ‘अनन्या’चा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला होता. आता ‘अनन्या’ चित्रपटातील एक रोमँटिक गाणे सोशल मीडियावर झळकले आहे. हृता दुर्गुळे आणि चेतन चिटणीस यांच्यात खुलत जाणारे हळूवार नाते यात दिसत आहे. ‘न कळत’ असे या गाण्याचे बोल असून बेला शेंडेचा सुमधूर आवाज या गाण्याला लाभला आहे. तर अभिषेक खणकर यांनी हे गाणे शब्दबद्ध केले असून समीर साप्तीसकर यांनी गाण्याला संगीत दिले आहे. 


संजय जाधव दिग्दर्शित 'तमाशा लाईव्ह' चित्रपटाचा भन्नाट ट्रेलर प्रदर्शित


गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला चित्रपट म्हणजे 'तमाशा लाईव्ह'. या चित्रपटाचे नावच इतके निराळे आहे की, या चित्रपटाविषयी मनात आपसूकच उत्सुकता निर्माण होते. त्यातच आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून यात काहीतरी जबरदस्त आणि मनोरंजनात्मक दिसत आहे. 'तमाशा लाईव्ह'मध्ये सोनाली कुलकर्णी, सचित पाटील, सिद्धार्थ जाधव, हेमांगी कवी, पुष्कर जोग, नागेश भोसले, मृणाल देशपांडे, मनमीत पेम, आयुषी भावे, यांच्या प्रमुख भूमिका असून येत्या 15 जुलै रोजी हा भव्य चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.  


'साई तुझं लेकरू'; 'टाइमपास 3' मधील धम्माल गाणे प्रेक्षकांच्या भेटीला


आई -बाबा आणि साईबाबाची शपथ असं म्हणणारा दगडू साईबाबांचा किती मोठा भक्त आहे, हे यापूर्वीच आपण दोन भागांमध्ये पाहिले आहे. दगडूचे हेच साईप्रेम 'टाइमपास 3' मध्येही पाहायला मिळणार आहे. 'साई तुझं लेकरू' हे गाणे नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले असून साईच्या चरणी दगडूचे कुटुंब आणि मित्र प्रार्थना करताना दिसत आहेत.


बहुचर्चित 'आर्या'चा तिसरा सीझन येणार प्रेक्षकांच्या भेटीला; निर्मात्यांनी केली घोषणा


बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सुष्मिता सेनच्या बहुचर्चित 'आर्या' या वेबसीरिजचा तिसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निर्मात्यांनी नुकतीच यासंदर्भात घोषणा केली आहे. लेडी डॉनच्या भूमिकेत पुन्हा एकदा सुष्मिता सेन दिसणार आहे.


करण जोहरसोबत परीक्षण करणार धक-धक गर्ल; काजोलने धुडकावली 'झलक दिखला जा'ची ऑफर


छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय कार्यक्रम 'झलक दिखला जा' हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. आता या कार्यक्रमाच्या दहाव्या सीझनला सुरुवात होणार आहे. हा कार्यक्रम टीआरपीच्या शर्यतीत नेहमीच पहिल्या क्रमांकावर होता. या कार्यक्रमात सेलिब्रिटींच्या नृत्याची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळत असते. या कार्यक्रमाचे परिक्षण वेगवेगळे सेलिब्रिटी करत असतात. 'झलक दिखला जा' या कार्यक्रमाच्या दहाव्या पर्वाच्या परिक्षणाची धुरा बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहर सांभाळणार आहे. काजोलने या कार्यक्रमाची ऑफर धुडकावली आहे. 


‘आता ह्याच्यावर एकदाचा पडदा पाडा!’, अभिनेता सुमीत राघवन यांची महाराष्ट्र सरकारला विनंती!


मुंबईतील मेट्रो कारशेड आरेतच बनवण्याचा निर्णय नवनिर्वाचित शिंदे सरकारनं घेतला आहे. या निर्णयाला पर्यावरणवाद्यांनी मोठा विरोध दर्शवला आहे. आरे जंगलातील मेट्रो कारशेडविरोधात पर्यावरणवाद्यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. तर, दुसरीकडे काही लोक या आरेतील कारशेडच्या निर्णयाला पाठिंबा देत आहे. यावरून बरेच वादही निर्माण झाले आहेत. आता या प्रकरणी अभिनेते सुमीत राघवन यांनी देखील एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमधून त्यांनी सरकारला हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची विनंती केली आहे.


रिलीज होण्याआधीच 'खुदा हाफिज 2' अडकला वादाच्या भोवऱ्यात; निर्मात्यांना मागावी लागली माफी


बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विद्युत जामवाल त्याच्या फिटनेसनं आणि अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. त्याचा आगामी चित्रपट खुदा हाफिज 2 रिलीज होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात आडकला आहे. या चित्रपटातील हक हुसेन या गाण्यावर शिया समुदायानं आक्षेप घेतला आहे. ज्यामुळे आता या चित्रपटाच्या निर्मात्यांना माफी मागावी लागली आहे. 


अजय देवगण पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या भूमिकेत; दाक्षिणात्य सिनेमा 'कॅथी'चा बनवणार हिंदी रिमेक


बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा 'रनवे 34' हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमात रकुल प्रीत सिंह आणि अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत आहे. अजयचा आगामी 'भोला' हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'कॅथी' या दाक्षिणात्य सिनेमाचा हा हिंदी रिमेक आहे. या सिनेमात अजय भोला हे पात्र साकारण्यासोबतच या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहे. 


प्रसिद्ध दिग्दर्शक तरुण मजुमदार यांचे निधन; वयाच्या 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास


बंगाली चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक तरुण मजुमदार यांचे आज (सोमवार) कोलकाता येथील रुग्णालयात निधन झाले आहे. मध्यमवर्गीय कुटुंबांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे तरुण मजुमदार हे आकर्षक कथांवर आधारित चित्रपट बनवण्यासाठी ओळखले जात होते. 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  मजुमदार यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून सरकारी एसएसकेएम रुग्णालयात उपचार सुरू होते. वृद्धापकाळामुळे त्यांचे निधन झाले. 1985 मध्ये तरुण मजुमदार यांनी अलोर पिपाशा या चित्रपटामधून दिग्दर्शक म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.