TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -


छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत दिसणार सुबोध भावे; दिवाळीत देशभरात घुमणार शिवगर्जना


'हर हर महादेव' हा सिनेमा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या सिनेमाची घोषणा झाल्यापासून या सिनेमात कोणते कलाकार असतील याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. नुकतचं या सिनेमाचं एक पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. 'हर हर महादेव' या सिनेमात बहुआयामी अभिनेता सुबोध भावे छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत दिसणार आहे.


'जम्मू फिल्म फेस्टिव्हल'ला आजपासून सुरुवात


 'जम्मू फिल्म फेस्टिव्हल'ला आजपासून (3 सप्टेंबर) सुरुवात झाली आहे. दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात 15 देशांतील 54 सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. जम्मूत सप्टेंबर 2019 मध्ये पहिल्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं होतं. कोरोनामुळे गेलं दोन वर्ष हा महोत्सव झाला नव्हता. पण यंदा मात्र जल्लोषात महोत्सव पार पडणार आहे. 


31 वर्षानंतर 'चारचौघी' नाटकाचा रंगभूमीवर प्रयोग


मराठी नाट्यविश्वात सध्या नवे-नवे प्रयोग होत आहेत. अनेक दर्जेदार नाटकांचे प्रयोग सध्या रंगभूमीवर होत आहेत. सध्या सुरू असलेल्या नाटकांना नाट्यरसिक उत्तम प्रतिसाद देत आहेत. नाटकांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याने लवकरच रंगभूमीवर एक नवीन नाटक येणार आहे. 'चारचौघी' असे या नाटकाचे नाव आहे. 


'ब्रह्मास्त्र'ने रिलीजआधीच केला रेकॉर्ड


बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा आगामी 'ब्रम्हास्त्र' सिनेमा 9 सप्टेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. रिलीजआधीपासूनच हा सिनेमा वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. शुक्रवारी या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली असून सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोरोना महामारीनंतर हा सिनेमा चांगली कमाई करू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. 


रश्मिका आणि बिग बींच्या ‘गुडबाय’चे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला!


बॉलिवूडचे महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन सध्या प्रचंड चर्चेत आहेत. त्यांच्याकडे सध्या अनेक नव्या चित्रपटांची रांग लागली आहे. अमिताभ बच्चन यांना रुपेरी पडद्यावर पाहणे नेहमीच रोमांचक असते. नुकतीच ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटातील त्यांची झलक प्रेक्षकांनी पाहिली होती. आता बिग बींनी चाहत्यांना आणखी एक खास भेट दिली आहे. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर आगामी चित्रपट ‘गुडबाय’चे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये त्यांच्यासोबत अभिनेत्री रश्मिका मंदनादेखील  झळकली आहे.


'इर्सल'चा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर


'इर्सल' हा मराठी सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी सिनेमागृहात प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. आता या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे. हा सिनेमा प्रेक्षकांना उद्या (रविवारी) दुपारी 12 आणि संध्याकाळी 6 वाजता पाहायला मिळणार आहे. 


केदार शिंदेंच्या लेकीचं मनोरंजन क्षेत्रात पदार्पण, ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटात साकारणार महत्त्वाची भूमिका!


संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील बिनीचे शिलेदार, स्वातंत्र्यसेनानी कृष्णराव साबळे अर्थात शाहीर साबळे यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात आजपासून झाली आहे. या जन्मशताब्दी वर्षात शाहीर साबळे यांच्या जीवनकार्याचा वेध 'महाराष्ट्र शाहीर' या आगामी सिनेमात घेतला जाणारे. शाहीर साबळे यांचा नातू आणि प्रख्यात दिग्दर्शक केदार शिंदे या सिनेमाची निर्मिती करतोय. मात्र, आजच्या या खास दिवसाचं औचित्य साधत केदार शिंदेने या सुवर्ण कथेतलं आणखी एक पान उलगडलंय. ‘महाराष्ट्र शाहीर’ या सिनेमाच्या माध्यमातून शाहीर साबळे यांची पणती अर्थात केदार शिंदे यांची लेक सना केदार शिंदे मनोरंजन विश्वात पदार्पण करतेय. या चित्रपटात सना आपल्या पणजीची म्हणजेच ‘सौ. भानुमती कृष्णराव साबळे’ यांची भूमिका साकारणारे. 


‘सोनालीला गोव्यात आणणं आमच्या प्लॅनचाच भाग’, आरोपी सुधीर सांगवानने दिली कबुली!


भाजप नेत्या आणि टिकटॉक स्टार सोनाली फोगाट  हत्येप्रकरणी पोलिसांनी त्यांचा पीए सुधीर सांगवान याला ताब्यात घेतले आहे. पोलीस कोठडीत चौकशीदरम्यान, सोनाली फोगाट यांना गुडगावहून गोव्यात आणण्याचा कट आपणच रचल्याची कबुली सुधीर सांगवानने दिल्याची माहिती गोवा पोलिसांच्या सूत्रांनी दिली आहे. गोव्यात शूटिंगचा कोणताही प्लॅन नव्हता, त्यांना गोव्यात आणण्याचा हा कट होता, असे त्याने पोलिसांनी सांगितले आहे. तसेच, सोनालीच्या हत्येचा कट फार पूर्वीपासून रचला गेला होता, याची कबुली देखील त्याने दिली आहे.


सुकेश चंद्रशेखर प्रकरणी नोरा फतेहीच्या अडचणीत वाढ


सुकेश चंद्रशेखर प्रकरणात अनेक बॉलिवूड अभिनेत्री रडारवर असून अनेक अभिनेत्रींच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे. काल (शुक्रवारी) अभिनेत्री नोरा फतेहीची दिल्ली आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात आली आहे. सुकेश चंद्रशेखर आर्थिक घोटाळ्याप्रकरणी नोराची चौकशी करण्यात आली. एक नाही, दोन नाही, तर तब्बल सहा तास नोरा फतेहीची चौकशी सुरु होती. दरम्यान, यापूर्वी याप्रकरणात अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसचीही चौकशी करण्यात आली होती.


'माझी तुझी रेशीमगाठ' घेणार प्रेक्षकांचा निरोप


'माझी तुझी रेशीमगाठ'  ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणारे. 17 सप्टेंबरला या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणारे. 'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याने या मालिकेची जागा आता दार उघड बये ही नवी मालिका घेणारे. 19 सप्टेंबरपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणारे.