TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या - 


मराठी चित्रपटसृष्टीमधील तारा निखळला; 'मोरूची मावशी' फेम अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन


मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेते  प्रदीप पटवर्धन  यांचे आज (9 ऑगस्ट) हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झाले. 65 व्या वर्षी त्यांनी  राहत्या घरी ( झावबावाडी, चर्नी रोड ) अखेरचा श्वास घेतला. आपल्या आभिनयानं प्रेक्षकांना भूरळ पाडणारं आणि मराठी चित्रपटसृष्टीत आणि नाट्यसृष्टीत आदरानं घेतलं जाणारं नाव म्हणजे प्रदीप पटनवर्धन. प्रदीप पटनवर्धन यांना बालपणापासूनच अभिनयाची आवड होती. कॉलेजमध्ये असताना त्यांनी बऱ्याचं स्पर्धा गाजवल्या. चित्रपट, नाटक आणि मालिका यांमधून प्रदीप हे प्रेक्षकांच्या भेटीस आले. 


कंगना रनौतला झाला डेंग्यू; आराम करायचा सोडून 'इमरजंसी'च्या शूटिंगमध्ये व्यस्त


बॉलिवूडची पंगाक्वीन कंगना रनौत सध्या 'इमरजंसी' सिनेमामुळे चर्चेत आहे. कंगना सध्या या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात कंगना मुख्य भूमिकेत असून दिग्दर्शनाची धुरादेखील सांभाळत आहे. शूटिंग दरम्यान कंगनाला डेंग्यू झाला आहे. पण कंगना विश्रांती घेण्याऐवजी 'इमर्जन्सी'चे शूटिंग पूर्ण करत आहे. 


'थोर लव्ह अॅन्ड थंडर'ने पार केला 100 कोटींचा टप्पा


हॉलिवूडचा सुपरस्टार क्रिस हेम्सवर्थचा 'थोर लव्ह अॅन्ड थंडर' हा सिनेमा जगभरात प्रदर्शित झाला आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. जगभरात या सिनेमाने अनेक रेकॉर्ड केले आहेत. भारतात या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. 


जयंत पवारांचं 'अधांतर' पुन्हा रंगभूमीवर येणार; 25 वर्षांपूर्वी गाजलेलं नाटक


मराठी नाट्यरसिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दिवंगत लेखक जयंत पवार लिखित 'अधांतर' हे नाटक तब्बल 25 वर्षांनी पुन्हा रंगभूमीवर सादर होणार आहे. 'प्रयोगशाळा' संस्थेने या नाटकाची निर्मिती केली असून 'नाटक मंडळी' ते सादर करत आहेत. आता पुन्हा एकदा हे नाटक नव्याने रंगभूमीवर येणार आहे.


सिद्धार्थ आणि पल्लवीच्या ‘प्रेमाची दास्तान’; ‘लव्हेबल’ गोष्ट अल्बम मधून उलगडणार


प्रेम या शब्दांत दडलेली भावना लाखमोलाची असते. प्रत्येकाच्या प्रेमाची एक वेगळीच कहाणी असते. राष्ट्रीय पारितोषिक विजेता अभिनेता सिद्धार्थ मेनन आणि अभिनेत्री पल्लवी पाटील  यांच्या प्रेमाची रोमँटिक दास्तान लव्हेबल अंदाजात लवकरच आपल्याला पहायला मिळणारआहे. ‘तेरी मेरी दास्तान’ या हिंदी गाण्याच्या अल्बम मधून हे दोघे आपल्या भेटीला येणार आहेत. या म्युझिक अल्बमच्यामाध्यमातून व्हिडीओ पॅलेस हिंदी अल्बम निर्मीती क्षेत्रात पदार्पण करीत आहेत.


'बॉईज 3' मधील ‘लग्नाळू 2.0’ गाणं रिलीज


सगळीकडे धमाल, मस्तीचे वातावरण निर्माण करणाऱ्या ‘बॉईज’मधील ‘लग्नाळू’ या गाण्याचे नवीन व्हर्जन ‘बॉईज 3’ या चित्रपटात पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. नुकत्याच एका भव्य सोहळ्याच्या माध्यमातून ‘लग्नाळू 2.0’ हे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्याचे संगीतकार अवधूत गुप्ते असून मुग्धा कऱ्हाडे हिने आपल्या ठसकेबाज आवाजात हे गाणे गायले आहे. प्रतीक लाड, पार्थ भालेराव, आणि सुमंत शिंदे यांच्यासोबत विदुला चौगुले हिनेही या गाण्यावर जबरदस्त ठेका धरला आहे. विदुला एकटीच त्या तिघांवरही भारी पडत असल्याचे यात दिसत आहे. राहुल ठोंबरे आणि संजीव होवालदार यांनी या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन केले आहे.  


'सिक्रेट ऑफ गावस्कर' वेब सीरिजचा थरारक ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला!


. क्राईम, रोमान्स, ऍक्शन, वजनदार कथानक, आणि उत्कृष्ट कलाकार यांची सांगड घालत ओटीटी विश्वावर राज्य करण्यासाठी क्राईम आणि थ्रिलरचं कॉकटेल घेऊन 'सिक्रेट ऑफ गावस्कर' ही नवीकोरी वेब सीरिज तगड्या स्टारकास्टसह प्रेक्षकांसमोर येण्यास सज्ज होत आहे. 'चंद्रा फिल्म एंटरटेनमेंट' निर्मित आणि 'व्हीमास मराठी' प्रस्तुत दिग्दर्शक तेजस लोखंडे दिग्दर्शित ही क्राईम आणि ऍक्शनचा भरणा असलेली वेब सीरिज लवकरच 'व्हीमास मराठी' या प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.


संजय जाधव यांनी केली 'पुन्हा दुनियादारी'ची घोषणा


'तेरी मेरी यारी...’ म्हणत प्रेक्षकांच्या भेटीला आलेला ‘दुनियादारी'हा चित्रपट समस्त महाराष्ट्राच्या पसंतीस उतरला होता. ज्येष्ठ साहित्यिक सुहास शिरवाळकर यांच्या कादंबरीवर आधारीत व दिग्दर्शक संजय जाधव  दिग्दर्शित 'दुनियादारी' या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक रेकॉर्ड मोडले. 10 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच कल्ला केला होता. आता या चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक-निर्माते संजय जाधव यांनी ‘फ्रेंडशिप डे’चं निमित्त साधत ‘पुन्हा दुनियादारी’  या चित्रपटाची घोषणा केली आहे.