TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या - 


'पोन्नियिन सेल्वन' सिनेमातील 'कावेरी से मिलने' गाणं आऊट


'पोन्नियिन सेल्वन' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे पोस्टर आऊट झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. टीझरदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस पडला. आता या सिनेमातील 'कावेरी से मिलने' हे पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 


आमिर खानच्या 'लाल सिंह चड्ढा'वर बहिष्कार घालण्याची नेटकऱ्यांची मागणी


बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा 'लाल सिंह चड्ढा' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच सोशल मीडियावर या सिनेमावर बहिष्कार टाकला जात आहे. #BoycottLaalSinghChaddha हे सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आहे. 


विवेक अग्निहोत्रींचा ट्विटरला रामराम


'द कश्मीर फाइल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री सध्या चर्चेत आहेत. विवेक अग्निहोत्रींनी नुकताच ट्विवटरला रामराम केला आहे. गेल्या काही दिवसांत अनेक सेलिब्रिटींनी ट्रोलिंगला कंटाळून ट्विटरला रामराम ठोकला आहे. आता विवेक अग्निहोत्रींनी ट्विटरला अलविदा केल्याने सोशल मीडियावर ते पुन्हा चर्चेत आले आहेत. 


रॅपर बादशाहने 'ऑडी Q8' नंतर खरेदी केली 'Lamborghini Urus'


तरुणाईंच्या लाडक्या रॅपर बादशाहने एक महागडी कार खरेदी केली आहे. बादशाहाने गेल्या काही दिवसांपूर्वी 'ऑडी Q8' ही कार खरेदी केली होती. या कारची किंमत 1 कोटी 23 लाख रुपये होती. बादशाहने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली होती. आता बादशाहने 'Lamborghini Urus' ही कार खरेदी केली आहे. 


होय मी संघ स्वयंसेवक! दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरची पोस्ट चर्चेत


'फर्जंद','फत्तेशिकस्त', 'पावनखिंड', 'शेर शिवराज' या सिनेमांच्या यशानंतर दिग्पाल लांजेकर शिवराज अष्टकातील आगामी 'गरुडझेप' या सिनेमाचं काम लवकरच सुरू करणार आहे. दरम्यान दिग्पालने संघाच्या रेशीमबागेला भेट दिली आहे. रेशीमबागेतील अनुभव त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केला आहे. दिग्पालची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


'मी पुन्हा येईन' प्रेक्षकांच्या भेटीला


महाराष्ट्राच्या राजकारणानं गेल्या काही दिवसांत मोठे भूकंप पाहिले, शेवटपर्यंत कुणालाच माहिती नव्हतं की काय होईल, एखाद्या सस्पेंस सिनेमापेक्षाही जबरदस्त असा क्लायमॅक्स सगळ्यांनी पाहिला. राजकीय घडामोडींच्या या पार्श्वभूमीवर वेबविश्वातही एक मोठी घडामोड घडली आहे. राजकारणातील साधारण परिस्थितीवर मार्मिक पद्घतीने भाष्य करणारी ‘मी पुन्हा येईन' ही वेबसीरिज 'प्लॅनेट मराठी’वर प्रदर्शित झाली आहे. 


'रॉकेट्री'च्या यशानंतर रजनीकांतने घेतली आर. माधवनची भेट


बॉलिवूड आणि दाक्षिणात्य अभिनेता आर माधवन सध्या 'रॉकेट्री: द नांबी इफेक्ट' या सिनेमामुळे चर्चेत आहे. हा सिनेमा इस्रो शास्त्रज्ञ नंबी नारायण यांच्या जीवनावर भाष्य करणारा आहे. हा सिनेमा पाहिल्यानंतर रजनीकांतने आता आर. माधवनची भेट घेतली आहे.


हार्दिक जोशी असू शकतो बिग बॉस मराठीचा पहिला स्पर्धक


बिग बॉस मराठीचा चौथा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या कार्यक्रमाचा प्रोमो आऊट झाला आहे. "मराठी मनोरंजनाचा बिग बॉस येतोय, लवकरच...आपल्या कलर्स मराठीवर" असं म्हणत बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनचा प्रोमो शेअर करण्यात आला. आता या कार्यक्रमात 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील राणा दा म्हणजेच हार्दिक जोशी सहभागी होणार असल्याचे म्हटले जात आहे.  


रणवीरच्या न्यूड फोटोशूटवर राखी सावंतची प्रतिक्रिया; म्हणाली, 'मला तुला असंच बघायचंय...'


रणवीरचं समर्थन करत राखी म्हणाली, 'मी दुबईवरुन परत आली आहे आणि सगळीकडे मी फक्त रणवीरच्या न्यूड फोटोशूची चर्चा आहे. रणवीरनं हे न्यूड फोटोशूट करुन मुलींच्या डोळ्यांना आणि ह्रदयाला शांती मिळाली. रणवीर या शूटमध्ये खूप छान दिसतोय. रणवीर माझ्या प्रिय मित्रा, असंच फोटोशूट करत राहा. मला तुला असंच बघायचंय आहे.


गायिका निर्मला मिश्रा यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन


प्रसिद्ध बंगाली गायिका निर्मला मिश्रा यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दक्षिण कोलकाता येथील चेतला भागातील राहत्या घरात निर्मला मिश्रा यांनी अखेरचा श्वास घेतला. बालाकृष्णा दास पुरस्कारानं निर्मला मिश्रा यांना गौरवण्यात आलं होतं.  रात्री बारा वाजून पाच मिनीटांना निर्मला मिश्रा यांना हृदयविकाराचा झटका आला होता, अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या वरिष्ठ डॉक्टरांनी दिली.