Digpal Lanjekar : 'फर्जंद','फत्तेशिकस्त', 'पावनखिंड', 'शेर शिवराज' या सिनेमांच्या यशानंतर दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) शिवराज अष्टकातील आगामी 'गरुडझेप' या सिनेमाचं काम लवकरच सुरू करणार आहे. दरम्यान दिग्पालने संघाच्या रेशीमबागेला भेट दिली आहे. रेशीमबागेतील अनुभव त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केला आहे. दिग्पालची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


दिग्पालने लिहिलं आहे,"शिवराज अष्टकाच्या माध्यमातून समाजाचा अनेकांगी आशीर्वाद आणि प्रेम सातत्याने लाभते आहे. पण माणसाच्या आयुष्यात काही क्षण हे सोनेरी अक्षरांनी लिहिण्यासारखे असतात आणि माझ्या आयुष्यात मला हे क्षण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने बऱ्याचदा अनुभवता आले आहेत आणि येत आहेत. 'रेशीमबाग' या ठिकाणी जाण्याचं... ती वास्तू अनुभवण्याचं... तिथे वास्तव्य करण्याचं प्रत्येक स्वयंसेवकाचं स्वप्न असतं... आणि या सगळ्यात तुम्हाला संघाच्या कुटुंबप्रमुखांचा म्हणजेच सरसंघचालकांचा सहवास लाभणार असेल तर? बालपणापासून स्वयंसेवक असलेल्या मला आणि माझा बंधू निखिलला हीच पर्वणी मिळाली 25 आणि 26 जुलैला". 



दिग्पालनं पुढे लिहिलं आहे,"पावनखिंडचं प्रदर्शन राष्ट्रीय स्तरावरच्या अनेक भाषिक ज्येष्ठ कार्यकर्ते प्रचारकांसह सरसंघचालकांसाठी रेशीमबागेत करण्यात आलं. ही कलाकृती पाहताना भाषा, प्रांत सगळे भेद सरले. काहीजणांना भाषा कळत नव्हती. पण भावना सगळ्यांना भिडत होती. शेवटी बाजीप्रभू आणि बांदल वीरांच्या त्यागाने बलिदानाने भावविभोर झालेल्या त्या देशभक्त कार्यकर्त्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. मा. मोहनजींनी दुसऱ्या दिवशी न्याहारीला भेटण्याचा निरोप दिला आणि भारावलेल्या मनानं आम्ही रेशिमबाग सोडली". 


नफा तोटा कसा सांभाळता? मोहनजींच्या प्रश्नाला उत्तर देत दिग्पाल काय म्हणाला? 


दिग्पाल म्हणाला,"नफा तोट्याचा आम्ही विचार करत नाही. पण शिवभक्तांसमोर प्रामाणिक शिवप्रेरणा मांडायचा प्रयत्न करतो. आम्ही खूप प्रामाणिक काम करत असल्याचं पटल्यामुळे शिवभक्त आम्हाला बुडू देत नाहीत. आख्खी शिवशक्ती हा शिव पराक्रमाचा सोहळा संपूर्ण जगात साजरी करते".


संबंधित बातम्या


दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांची प्रकृती स्थिर; अति ताणामुळे मुंबईला जाताना झाला त्रास


Pawankhind Movie Teaser : 'पावनखिंड' चा टीझर रिलीज; 'या' दिवशी येणार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस